
. सिन्नर (वसंत गोसावी , सिन्नर प्रतिनिधी) : रायगड किल्ला, जो मराठी सामर्थ्याचा गड आणि स्वराज्याचा श्वास आहे, त्या गडावर नुकताच 351 वा द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. श्री सिन्नर दशनाम गोसावी समाज संस्थेतर्फे सरचिटणीस वसंत गोसावी, माजी अध्यक्ष रतनपुरी गोसावी, शहर अध्यक्ष भैरवनाथ गोसावी यांच्यासह छगन गोसावी,शरद गोसावी, सुभाष गोसावी, संजय गोसावी, सुरेश गोसावी आदी समाजबांधव या ऐतिहासिक सोहळ्यास साक्षीदार झाले.महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण आठवण करून देणारा हा सोहळा होता. 24 सप्टेंबर 1674 रोजी महंत निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी तांत्रिक पद्धतीने शिवराज्याभिषेक करून घेतला होता. त्यापुर्वी सहा जून 1674 रोजी काशीच्या गागाभट्टांनी वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केला होता. मात्र या द्वितीय राज्याभिषेकाच्या माध्यमातून महाराजांनी सामाजिक न्याय, समता आणि सर्वधर्मसमभाव यांचा संगम घडवून आणला होता. त्याच ऐतिहासिक परंपरेचे स्मरण म्हणून आजही रायगडावर हजारो शिवप्रेमी दरवर्षी एकत्र येतात.

या सोहळ्याची सुरुवात रायगडाच्या पहिल्या पायरीचे पंचोपचार पुजन करून झाली. रायगडावर उपस्थित माता भगिनींच्या हस्ते शिरकाई मातेचे ओटी भरण पूजन करुन महाआरती झाली. सदरेवरील सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून, “जय भवानी! जय शिवाजी!”, “तुमचं-आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय!” अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला. शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून शोभायात्रा होळीच्या माळावर नेण्यात आली.

होळीच्या माळावर शिवरायांच्या पुतळ्याचे पुजन करून मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक झाले. तेथून शोभायात्रा रायगड बाजारपेठेतून जगदीश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली. शंखध्वनी, ढोल-ताशे, भगव्या पताकांच्या लहरी, आणि जयघोषांनी रायगडाचा प्रत्येक दगड पुन्हा एकदा इतिहास जागवू लागला होता.जगदिश्वर मंदिराच्या प्रांगणात महाराष्ट्राचे ख्यातनाम शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी “शिवराज्याभिषेकाचे सामाजिक आणि राजकीय महत्त्व” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. रायगडाचे स्वराज्यातील महत्त्व, स्वराज्यरक्षक मावळे , शिवरायांची दक्षिणेतील मोहिम व शंभूराजांचे व्यक्तिमत्त्व या विषयावर त्यांनी प्रकाशझोत टाकला.

या सोहळ्यासाठी पुणे येथून संदीप भारती, महंत अमोल गोसावी, सूर्यकांत गिरी, सातारा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गोसावी, बीड जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गिरी, कोल्हार अहिल्यानगर येथून शाम गोसावी, विलास गोसावी, मुकुंद गोसावी, दादा गोसावी, अण्णासाहेब गोसावी, प्रकाश भारती, पंकज भारती, दशरथ गिरी, नवनाथ भारती, ज्ञानेश्वर गिरी, किशोर गोसावी, श्याम भाऊ गोसावी, महावीर गिरी यांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि दशनाम गोसावी समाजाचे बांधव यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून रायगडाच्या वैभवाला वंदन केले. सिन्नर येथील समाधी पुजारी वसंत गोसावी व समाजबांधव यांच्या हस्ते जगदीश्वराची शिवमानसपूजा करून राज्याभिषेक सोहळ्याची सांगता झाली.सिन्नर तालुक्यातील दशनाम गोसावी समाज गेली दहा ते पंधरा वर्षे अखंडपणे या सोहळ्यात सहभाग नोंदवत आहे. त्यांच्या या परंपरेमुळे रायगड आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याशी सिन्नरचा एक अदृश्य परंतु दैवी नातेसंबंध निर्माण झाला आहे. रायगडाचा गड, छत्रपतींची आठवण, आणि जनसमुदायाचा उत्साह या संगमामुळे द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला.
