
नाशिक:- (प्रतिनिधी). आधुनिक काळात माणुसकीवर श्रद्धा ठेवणारी माणसं निर्माण होण्यापेक्षा अंधश्रद्धांच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे, असे प्रतिपादन डॉ.ठकसेन गोराणे यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘कथा अंधश्रद्धांच्या; व्यथा माणसांच्या’ या पुस्तकावर १८६वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अलका दराडे होत्या. डॉ.गोराणे पुढे म्हणाले की, केवळ प्रबोधन करून अंधश्रद्धा दूर होणार नाही. यासाठी कायद्याचा बडगा असल्याशिवाय समाजजागृती होणार नाही. कायदा व्हावा; यासाठी रक्ताने सह्या करून मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. त्यामुळे कायदा अस्तित्वात आला. पण समाज आजही फसवणूक आणि शोषणाचा बळी ठरत आहे. पुस्तकातील २६ भागांमध्ये अंधश्रद्धेला बळी पडलेल्या व्यक्तींच्या कथा आहेत. अंधश्रद्धेच्या कुबड्या घेऊन समाज बुवाबाजी, भोंदूगिरीला खतपाणी घालत आहे. हे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत समाजव्यवस्था सुधारणार नाही, असेही ते म्हणाले. नितीन बागुल आणि रंजन लोंढे यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर तुकाराम ढिकले यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (३०) अर्जुन कोकाटे ‘अस्वस्थ शतक’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
