
लासलगाव, दिनांक २६ सप्टेबर (प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर विभागाच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 हा राष्ट्रीय सेवा योजना आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत विविध उपक्रमांचे व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी ‘जागतिक पर्यावरण आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प प्रा.रामनाथ कदम यांनी गुंफले. त्यांनी ‘जागतिक पर्यावरण आणि मानवी आरोग्य’ या विषयावर रा.से.यो. स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.महेश होळकर होते. तसेच मंचावर वाणिज्य शाखेचे प्रा.नितीन शिंदे, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.देवेंद्र भांडे व प्रा.सुनिल गायकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सरस्वती माता आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमा पुजनाने झाली. कार्यक्रमास वक्ते म्हणून लाभलेले प्रा.रामनाथ कदम यांनी आपल्या मार्गदर्शनात अध्यात्म व पर्यावरणाची सांगड घालत मानवी आरोग्य टिकविण्यासाठी शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ परिसर आवश्यक असल्याचे नमूद केले. पाणी, हवा आणि अन्नाची गुणवत्ता थेट मानवी आरोग्यावर परिणाम करते. म्हणूनच आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रा.महेश होळकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या झपाट्याने वाढत आहेत. आपण सर्वांनी मिळून वृक्षारोपण, पाणी बचत, प्लास्टिक कमी वापरणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, स्वच्छता राखणे या छोट्या गोष्टी अंगीकारल्या तर आपण पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित आणि निरोगी पर्यावरणासाठी हातभार लावू शकतो असा संदेश दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.ज्ञानेश्वर घायाळ या स्वयंसेवकाने केले, प्रास्ताविक कु.श्वेता पगारे यांनी केले व वक्ता परिचय कु.सौरभ घुले यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन कु.वैभव आहिरे या विद्यार्थ्यांने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे व रा.से.यो. स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सर्व रा.से.यो. स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
