
नांदगाव ( वार्ताहर ) नांदगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बी.एम.अहिरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे महत्त्व विशद करून महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंसेवक म्हणून काम करतांना विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातच श्रमदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे बाळकडू मिळत असल्याने समाजात वावरताना इतर समाज घटकांशी सकारात्मक रित्या समायोजन साधण्याची कला अवगत होत असल्याचे विशद केले व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.

ह्या निमित्ताने महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात व्याख्याते प्रसिद्ध लेखक व कवी प्रा.सुरेश नारायणे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेची आवश्यकता व महत्त्व आपल्या स्वानुभवातून पटवून दिले. सखोल मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण, रक्तदान,आपत्ती व्यवस्थापन, पथनाट्य इ. उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन समाजामध्ये आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले.राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंसेवक म्हणून काम करताना नेतृत्व गुण, समानुभूती,श्रमप्रतिष्ठा इ. गुण विकसित होतात त्यामुळे सामाजिक समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक समाजात आदर्श प्रस्थापित करण्यासाठी तत्परतेने कार्यप्रवण होऊ शकतो असे सुतोवाच केले. त्यांनी सर्व एन.एस. एस.स्वयंसेवकांना सामाजिक कार्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन केले. सदर प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व्याख्याते सुरेश नारायणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे,आदर्श शिक्षक प्रा.जी.के.बेंडकुळे इ. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला

. ह्या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी वैष्णवी कवडे, निकिता फोडसे, श्वेता काळे, नम्रता फोडसे, आफरीन मंसूरी, स्वप्निल निकम, विशाल पवार, सुवर्णा खरक, हर्षद बोरसे,अविनाश उगले, जयदीप सोनवणे, वर्षा निकम यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी मान्यवरांसोबत मंचावर महाविद्यालयाच्या आयक्यूएसीचे समन्वयक प्रा.आटोळे, प्रा. बोरसे, प्रा. बेंडकुळे,प्रा.पैठणकर, प्रा. श्रीमती पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के. पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.जी.व्ही. बोरसे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने करण्यात आली.
