
नाशिक:(.प्रतिनिधी ) – प्रत्यक्ष घडलेल्या घटना आणि लेखकाकडे असलेली प्रतिभाशक्ती यांच्या चिंतनातून स्वतंत्र कादंबरीचा जन्म होत असतो. धरणाची निर्मिती होत असताना आलेले विविधांगी अनुभव मांडणाऱ्या ‘धरणसुक्त’ या कादंबरीला वास्तवतेची किनार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक इंजि.विलास शेळके यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात १८५वे पुष्प गुंफताना ते ‘धरणसुक्त’ या कादंबरीवर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.यशवंत पाटील होते. इंजि.शेळके पुढे म्हणाले की, शासकीय सेवेत धरण तयार होणाऱ्या परिसरात प्रत्यक्ष काम करताना नदीचे खोरे स्वयंपूर्ण कसे होईल, यासह पाण्याची बचत करण्यासाठी अभ्यासपूर्ण चिंतन केले. धरणाची उभारणी होत असताना आलेले अनुभव आणि बांधकामप्रसंगी अधिकारी, मजूर, स्थानिक लोक यांना जवळून पाहिले. या काळातील अस्वस्थ करणारे काही क्षण अगदी जवळून अनुभवले. हे सर्व अनुभव कादंबरीत सांगितले आहेत. कादंबरीलेखन करताना अतिशय जोखमीने आणि जबाबदारीने जे घडलं; ते पुरेपूर मांडण्याचा प्रयत्न केला असल्याने ही कादंबरी सर्वत्र पोहोचली, असेही ते म्हणाले. बाबुराव मुखेडकर आणि सय्यद रियाझ यांना ग्रंथभेट देण्यात आली. मधुकर गिरी यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक पाटील यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (२६) ‘कथा अंधश्रद्धेच्या-व्यथा माणसांच्या’ या पुस्तकावर डॉ.ठकसेन गोराणे बोलणार आहेत.
