
सिन्नर (प्रतिनिधी )–छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर होत असलेल्या ऐतिहासिक उत्सवात सहभागी होण्यासाठी श्री सिन्नर दशनाम गोसावी समाज संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आज मंगळवारी (ता. 23) उत्साहात रवाना झाले.सकाळी सिन्नर शहरातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून यात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे सरचिटणीस वसंत गोसावी, माजी अध्यक्ष रतन शपुरी गोसावी, शहराध्यक्ष भैरवनाथ गोसावी, तसेच शरद गोसावी, छगन गोसावी, संजय गोसावी, सुभाष गोसावी, सुरेश गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.24 सप्टेंबर 1674 रोजी रायगडावर महंत निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक वैदिक पद्धतीने पार पडला होता. सामाजिक समतेचा नवा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आज लाखो शिवप्रेमी व समाजबांधव रायगडावर एकत्र येत आहेत.श्री सिन्नर दशनाम गोसावी समाज संस्थेतर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून अखंडपणे या उपक्रमात सहभाग घेतला जात आहे.दरम्यान, सिन्नर येथील महामित्र परिवारातर्फे उद्या 24 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तर साडेआठ वाजता राष्ट्रपिता महात्मा फुले पुतळ्याजवळ द्वितीय शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होणार असल्याची माहिती महामित्र दत्ता वायचळे यांनी दिली आहे. शिवप्रेमींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.कार्यक्रमापूर्वी आद्यगुरु शंकराचार्य, छत्रपती शिवाजी महाराज व महंत निश्चलपुरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. “जय भवानी, जय शिवाजी” “जय जिजाऊ जय शिवराय” , “जय ज्योती जय क्रांती”, “तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय” च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि 1870 पासून पुण्यात शिवजयंती उत्सवाची परंपरा सुरू केली. या ऐतिहासिक कार्याला अभिवादन करीत समाज बांधवांनी रायगड प्रस्थान केले. आपल्या भावी पिढीसाठी हा ऐतिहासिक वारसा जपणे व पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
