
, सिन्नर (प्रतिनिधी, वसंत गोसावी ) :नवभारत साक्षरता कार्यक्रम (NILP) अंतर्गत रविवारी (दि. 21 सप्टेंबर 2025) सिन्नर तालुक्यात नवसाक्षरांची भव्य परीक्षा उत्साहात पार पडली. या परीक्षेत तब्बल 1557 नवसाक्षरांनी सहभाग नोंदवला असून उपस्थितीचा दर प्रभावी 99.61 टक्के इतका राहिला.सिन्नर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ. विजय बागूल, डुबेरे बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सांगळे आणि ब्राम्हणवाडे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यातील केंद्रप्रमुखांनी परीक्षेचे संयोजन केले. ठाणगाव, ब्राम्हणवाडे, दापूर, सिन्नर, डुबेरे, मुसळगाव, किरतांगळी, शहा, सोनांबे, मह्रळ आदी केंद्रातील विजय खैरनार, कृष्णकांत शिंदे, दत्तात्रय गवळी, विजय निरगुडे, मिनाक्षी सोनवणे, बाळासाहेब फड, शिवाजी बर्गे, तानाजी पवार, नवनाथ आढाव या केंद्रप्रमुखांनी परीक्षा यशस्वीरित्या पार पाडली.तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व आश्रमशाळा मिळून 240 परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली होती. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी केंद्रसंचालक म्हणून काम पाहिले

तर वर्गशिक्षक आणि स्वयंसेवकांनी पर्यवेक्षण करून तात्काळ उत्तरपत्रिका तपासणी केली.राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या FLNAT (Functional Literacy Numerical Assessment Test) या परीक्षेचा भाग म्हणून या चाचणीमध्ये लेखन, वाचन आणि गणित या मूलभूत घटकांची कसोटी घेण्यात आली.“साक्षरतेसोबतच जीवनोपयोगी कौशल्य आत्मसात करण्यासाठी या परीक्षा महत्त्वपूर्ण ठरतात,” असे मत डॉ. विजय बागूल यांनी व्यक्त केले.या परीक्षेमुळे सिन्नर तालुक्यातील नवसाक्षरांनी आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवला असून, पुढील काळात साक्षरतेचा वेग अधिक गतिमान होईल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे. सिन्नर तालुका आज खऱ्या अर्थाने ज्ञानदीप प्रज्वलित करणारा ठरला आहे.
