
निगडोळ 🙁 प्रतिनिधी ) येथील रयत शिक्षण संस्थेचे मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या ज्ञानसंकुलात पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ आण्णांची १३८ वी जयंती साजरी झाली.सकाळी कर्मवीरांची निगडोळ गावात सवाद्य भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.विद्यालयाच्या प्रांगणात कर्मवीरांची जयंती साजरी झाली.कर्मवीरांच्या व रयत माऊली लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन विद्यालयाच्या सल्लागार समितीचे चेअरमन मा.बबनरावजी मालसाने दादा व मान्यवरांच्या हस्ते झाले.

विद्यालयातील ऋतुजा वाघ,समृद्धी सोनवणे व भावना भोये या विद्यार्थिनींनी आपली मनोगते सादर केली.ग्रामीण साहित्यिक,कवी व विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.देवदत्त बोरसे सर प्रमुख व्याख्याते होते.आपल्या मनोगतातून महाराष्ट्राचे थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनचरित्रावर त्यांनी सुंदर शब्दांनी प्रकाशझोत टाकला.संघर्षाचं रणकंदन पार करून कर्मवीरांनी रयतेसाठी हर्षाचे नंदनवन कसं निर्माण केलं व समाजातील शोषित,पीडित,दलित,वंचित,आदिवासी व बहुजनांच्या मुलांसाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातल्या चंद्रमोळी झोपडीपर्यंत कशी पोहचवली हे त्यांनी आपल्या व्याख्यानातून विशद केलं. कर्मवीरांच्या जयंती सोहळ्यास विद्यालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य संजय मालसाने,रमेश मालसाने,अशोक मालसाने,सुमनताई जगताप,निगडोळ ग्रा.पं.चे सरपंच मा.कृष्णा रहेरे,शशिकांत मालसाने व निगडोळ पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ,विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी,माजी विद्यार्थी व कृषी क्षेत्रातील मान्यवर,रयत सेवकवृंद सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

सांस्कृतिक विभाग प्रमुख अमोल वाघमारे व प्रतिभा गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.ज्येष्ठ शिक्षक नितीन कापडणीस यांनी सूत्रसंचालन केले व सुभाष बेद्रे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास देवरे,तुळशीदास भामरे,अवधूत मालसाने व स्वप्निल गोडसे यांनी अनमोल सहकार्य केले.
