
मुंबईच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शामराव शिंदे यांचा सपत्नीक सन्मान करताना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे. समवेत माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, कल्पना शिंदे आणि संयोजक.
नाशिक:- ( प्रतिनिधी )माणुसकीची कास धरून पोलीस दलात कर्तव्य भावनेने कार्य केल्यास देशभक्तीबरोबरच समाजाचीही सेवा घडत असते. कृतज्ञ भावनेने अशी सेवा केल्यामुळे लाभलेला सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार हा कार्यतत्पर पोलीस वर्दीचा सर्वोच्च सन्मान आहे, असे गौरवोदगार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढले.
सजग नागरिक संघ आणि साहित्यिक मित्र परिवाराच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील भगूरचे सुपुत्र आणि मुंबईच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शामराव शिंदे यांचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सावानाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात आयोजित सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोहळ्याचे अध्यक्ष माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, सन्मानार्थी शामराव शिंदे, कल्पना शिंदे आणि सजग नागरिक संघाचे अध्यक्ष संजय करंजकर मंचावर होते.
श्री.कराळे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्यामुळे राष्ट्रप्रेमाची दिशा देणारं भगूर हे गाव नेहमीच सर्वांसाठी वंदनीय आहे. अशा गावात संरक्षण आणि पोलीस दलात कर्तृत्व गाजवणाऱ्या शामराव शिंदे यांचा अभिमान वाटतो, असे सांगून श्री.शिंदे या ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणजेच वर्दीच्या सन्मानासाठी उपस्थित असलेल्या दर्दी रसिकांच्या उपस्थितीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या हस्ते श्री.शिंदे यांचा सन्मानचिन्ह आणि मानपत्र प्रदान करत संजय करंजकर, प्रा.सोमनाथ मुठाळ, गणेश बर्वे, कामगारनेते प्रशांत कापसे, अविनाश कातकाडे, संदीप देशपांडे, भगूरच्या स्वा.वीर सावरकर जयंती उत्सव समितीचे आधारस्तंभ सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त रमेश पवार, भगूरचे माजी उपनगराध्यक्ष दीपक बलकवडे, वसंत पाटील, अनिल पवार यांच्या उपस्थितीत सपत्नीक सन्मान करण्यात आला. श्री.शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना पोलीस विभाग, परिवार आणि संयोजकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात नानासाहेब बोरस्ते यांनी आपली माणसं आणि आपली माती यांचा ऋणानुबंध जोडणारा हा सोहळा आहे. देशप्रेमाचं वारं आणि समाजसेवेचं व्रत घेतलेली श्री.शिंदे यांच्यासारखी कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्वंच पोलीस दलात उत्तम कामगिरी करतात, अशा शब्दांत गौरव केला.

प्रारंभी संपन्न झालेल्या निमंत्रितांच्या काव्यसंध्येत कवी प्रा.राजेश्वर शेळके, प्रशांत केंदळे, अलका कुलकर्णी, सुरेश पवार, शुभांगी पाटील यांनी उत्तमोत्तम कविता सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. काव्यसंध्येचे सूत्रसंचालन संदीप देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील साहित्यिक आणि रसिक उपस्थित होते. मुख्य संयोजक प्रशांत कापसे यांनी मानपत्र वाचन केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेंबाडे, चंद्रकांत शिंदे, जयंत गाडेकर, युवाउद्योजक संकेत शिंदे, रामचंद्र शिंदे यांनी स्वागत केले. संदीप देशपांडे यांनी प्रास्ताविक तर प्रा.सोमनाथ मुठाळ यांनी आभार मानले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
