
नाशिक (प्रतिनिधी) :भारतीय शास्त्रीय संगीत हे आत्म्याशी नाते सांगणारे, जीवन साधनेचे महत्त्व पटवून देणारे आहे. या कलेची जोपासना करण्यासाठी केवळ मेहनत व जिद्द पुरेशी नसून परंपरा आणि आधुनिक जाणीव यांचा सखोल अभ्यास करणेही तितकेच आवश्यक आहे. हीच परंपरा पुढील पिढीकडे पोहोचवण्यासाठी आणि कुमारवयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सूर विश्वास कुमारमंच’ हे व्यासपीठ दिशादर्शक ठरत आहे. “या मंचातून भविष्यात अनेक उत्तम कलाकार समाजासमोर येतील,” असे प्रतिपादन शास्त्रीय संगीत तज्ञ व संगीत संयोजक प्रसाद गोखले यांनी व्यक्त केले.‘कुमार’ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘सूर विश्वास कुमारमंच’चे चौदावे पुष्पविश्वास बँक डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे उत्साहात फुलले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तबला वादन, संवादिनी वादन तसेच समूह शास्त्रीय गायन अशा विविध सादरीकरणांनी रसिकांची मने जिंकलीएकल तबला वादन स्पर्श कर्पे यांनी तीन ताल कायदा व झपताल कायद्याचे मनमोहक वादन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.सोलो संवादिनी वादन ऋग्वेद पाठक यांनी राग बिहाग मधुर स्वरात रंगवून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.समूह शास्त्रीय गायन पुणे विद्यार्थी गृहाचे डॉ. काकासाहेब देवधर इंग्लिश माध्यमिक विद्यालयाच्या गीत मंचातील विद्यार्थ्यांनी राग बिहाग सादर केला.

तनिष्का कुलकर्णी, आरोही देशपांडे, प्रांजल चिमणकरे, स्पर्श कर्पे, संजीवनी खलाणे, सारा बच्छाव, ऋग्वेद पाठक, मोहित गवळी, भार्गवी कुलकर्णी आणि कस्तुरी विरगावकर या विद्यार्थ्यांनी एकसुरात गायन सादर करत शास्त्रीय रागांची ओळख अधिक ठसवली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विनायक रानडे यांनी केले. “शालेय पातळीवर शास्त्रीय संगीताची आवड रुजवावी, यासाठी हा उपक्रम सातत्याने राबविला जातो,” असे ते म्हणाले.या मैफलीच्या मार्गदर्शन अंजली कुलकर्णी होत्या तर सूत्रसंचालन तेजस मालपुरे यांनी प्रभावीपणे केले.आयोजक विश्वास लिलावती जयदेव ठाकूर, ऋचिता ज्योती विश्वास ठाकूर आणि संकल्पक विनायक आशा पुरुषोत्तम रानडे आहेतया उपक्रमास विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे (शाखा जलालपूर), विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ आणि ग्रंथ तुमच्या दारी या संस्थांचा मोलाचा सहयोग लाभला.संगीताच्या संवर्धनाची आणि कुमारवयीन विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनाची ही मैफल, उपस्थित रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली.
