
*मखमलाबाद (प्रतिनिधी) *United Way Mumbai, Bosch India या संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा विषयाबाबत जाणीव जागृती करण्यासाठी मखमलाबाद जुनिअर कॉलेजमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली. जुनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. विकास थोरात यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक तथा हेतूकथन करून कार्यशाळेसाठी उपस्थित नाशिक जिल्हा समन्वयक सदाशिव गणगे, वैशाली नेवे तसेच प्रशिक्षक विकी उबाळे, राकेश ढाकणे व संपूर्ण टीमचे औपचारिक स्वागत केले.

रस्ता सुरक्षा ही आजची काळाची गरज असून तरुणांमध्ये त्याबद्दल जाणीव जागृती निर्माण होण्याच्या हेतूने ही कार्यशाळा घेण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबद्दल माहिती असणे अत्यावश्यक असून या नियमांचे पालन करणे अनिवार्य का आहे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. हेल्मेट आणि सीट बेल्टचे महत्त्व, चालक परवाना, वैयक्तिक व वाहन विमा, पीयूसी इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता, वाहन पार्किंगचे नियम, सिग्नल, रस्त्यावरील विविध प्रकारचे वाहतूक चिन्ह याबाबत सखोल माहिती व्हिडिओ क्लिप्स व पीपीटी द्वारे देण्यात आली. 18 ते 45 या वयोगटातील अपघाताचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचेही नमूद करण्यात आले.

वाहन चालवितांना शारीरिक व मानसिक आरोग्य स्थिर असणे आवश्यक आहे. मद्यपान करून गाडी न चालविणे, गाडी चालविताना मोबाईलचा वापर न करणे या संदर्भात विद्यार्थ्यांना व्हिडिओ क्लिपद्वारे प्रभावी उद्बोधन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांची अधिकृत नोंदणी करून उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात आले. प्रश्नावलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना सिम्युलेटर (अभिरूप वाहन) च्या माध्यमातून स्क्रीनवर प्रात्यक्षिक करण्याची संधी मिळाली. महाविद्यालयाचे प्राचार्य संजय डेर्ले यांनी कार्यशाळेला भेट देऊन समाधान व्यक्त केले. जुनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. विकास थोरात, प्रा. विजय पगार, सोमेश्वर मुळाणे, जुनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
