
नाशिक:- (प्रतिनिधी ) आजही ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित आहे. तिथलं जीवन मोठ्या प्रमाणात हलाखीचं आहे. या शेतकऱ्यांचं दु:ख आणि मातीच्या वेदना जाणून ग्रामीण जीवनातील जीवघेणे वास्तव साहित्यात मांडता आले पाहिजे, असे प्रतिपादन चांदवड येथील सुप्रसिद्ध कवी सागर जाधव-जोपुळकर यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात १८४वे पुष्प गुंफताना ते ‘माती मागते पेनकिलर’ या पुस्तकावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक वाळू आहेर होते. ते पुढे म्हणाले की, माती मागते पेनकिलर या संग्रहात ग्रामीण जीवनातील वास्तव मांडून शेतीतील संकटांना सांभाळत मातीच्या यातनांना समजून व्यवस्थेविरुद्ध आतून आलेला शब्दांचा हुंकार आहे. माणूसपणाचा शोध घेत ग्रामीण भागातील वेगवेगळ्या भावनांचे चित्रिकरण या संग्रहात प्रभावीपणे मांडले आहे. भाऊबंदकी, ऑडिट, पुरावा, शेणाच्या वासाचा शहरी उमाळा, पदराआड गेलेलं माहेर, आकाश, चक्रव्यूह, सत्ताधारी, माहेराची पोर अशा विविध कवितांमधून सामाजिक जाणिवा प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतीत पेरूनसुद्धा शिवार कसा मुका होतो, याचे चित्रणही मांडले आहे, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ उद्योजक पांडुरंग चव्हाण आणि बाळासाहेब उगले यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर जयश्री वाघ यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (२३) ज्येष्ठ साहित्यिक विलास शेळके ‘धरणसुक्त’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
