
जिल्हास्तरावर निवड झालेल्या चंदन राठोड आणि नासाका विद्यालयाच्या क्रीडापटूंच्या सत्काराप्रसंगी मुख्याध्यापक अरुण पगार, पालक विलास राठोड यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी.
नाशिकरोड:-( प्रतिनिधी )पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाचा नववीचा विद्यार्थी चंदन विलास राठोड याची नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर निवड झाली. आडगाव नाका परिसरातील मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये नुकत्याच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये चंदन राठोड याने ४०० मीटर धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. विद्यालयाचा विद्यार्थी आर्यन सानप याने २०० मीटर धावणे या प्रकारात चतुर्थ क्रमांक मिळवला. सर्वेश कोळगे याने १०० मीटर धावणे आणि चंदन राठोड, ओम जाधव, आर्यन सानप, प्रणव गायधनी यांनी ४०० मीटर रिले स्पर्धेत सहभाग नोंदवला. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अरुण पगार पालक विलास राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक आणि कर्मचारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. क्रीडाशिक्षक व्ही.ए.पाटील यांच्यासह विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे नासाकाचे व्यवसायक प्रदीप आव्हाड, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांसह विद्यार्थी, परिसरातील पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
