
कासारी ( प्रतिनिधी ) शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शाळेत नियमित पालक सभांचे आयोजन करून पालकांचा जास्तीत- जास्त सहभाग मिळवावा,असे प्रतिपादन कासारी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्रजी काटकर सर यांनी शिक्षण परिषदेप्रसंगी मोरेवाडी शाळेत केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कासारी केंद्राची शिक्षण परिषद मोरेवाडी शाळेत यशस्वीरित्या पार पडली.सदर शिक्षण परिषदेत केंद्रप्रमुख राजेंद्रजी काटकर सर,केंद्रमुख्याध्यापक भाऊसाहेब मवाळ सर, ग्रेडपात्र मुख्याध्यापक रोहिदास निकम सर,संजीव पवार सर,केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद मुख्यमंत्रीयुवा प्रशिक्षणार्थी,तसेच मोरेवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे,उपाध्यक्ष नवनाथ पवार,पालक यादव मोरे, काभू मोरे,देविदास सांगळे,जिभाऊ मोरे व विद्यार्थी उपस्थित होते.सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व विद्येची देवता सरस्वती माता यांच्या फोटोचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून दीप प्रज्वलन करण्यात आले

याप्रसंगी मोरेवाडी शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.नुकताच जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत ‘५ सप्टेंबर ‘ शिक्षकदिनी गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले कासारी केंद्रातील जळगाव बुद्रुक शाळेतील आदर्श शिक्षक शैलेश टिळेकर सर यांचा इंदिरानगर,मोरेवाडी व माणिकपुंज शाळेच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला.तसेच या महिन्याच्या शेवटी सेवानिवृत्त होणाऱ्या सेवाज्येष्ठ शिक्षिका शारदा महाले मॅडम यांचाही सत्कार मोरेवाडी व इंदिरानगर शाळेच्या वतीने करण्यात आला.शिक्षण परिषदेत तज्ञमार्गदर्शक गोकुळ निकम सर यांनी बेरीज- वजाबाकी संबोध यांची संकल्पना स्पष्ट केली.संजय अगोणे सर यांनी इंग्रजी शब्दांचे ध्वनीशास्त्र,अक्षरे आणि त्यांचे आवाज यांच्यातील सहसंबंध समजून सांगितला तर सतीश बिरारी सर यांनी पालक सभांचे महत्त्व शिक्षण परिषदेत विशद केले.सदर शिक्षण परिषदेत इंदिरानगर शाळेचे मुख्याध्यापक भरत देवरे सर,उपशिक्षक प्रकाश शिंगाडे सर,किशोर शिंदे सर, मोरेवाडी शाळेचे मुख्याध्यापक गणेश बागुल सर,उपशिक्षिका योगिता कापुरे मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बागुल सर यांनी केले तर भरत देवरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
