
सिन्नर ( प्रतिनिधी : वसंत गोसावी) सिन्नर तालुक्यातील खडांगळी परिसरात नरभक्षक बिबट्याने थैमान घालत अवघ्या आठ दिवसांत चौथा हल्ला चढवला आहे. शनिवारी दोन वर्षीय गोलू युवराज शिंगाडे या चिमुकल्याचा बळी घेतल्यानंतर अवघ्या पंधरा तासात रविवारी (ता. 14) सकाळी साडेदहाच्या सुमारास गिते वस्तीवर पुन्हा एकदा हल्ला झाला. धुणे धुणाऱ्या वैशाली प्रभाकर गिते (वय 24) यांच्यावर बिबट्याने पाठीमागून झडप घातली.अचानक आलेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेल्या वैशाली यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून जवळच असलेल्या सासू सुशिला बाळासाहेब गिते धावत मदतीला आल्याने बिबट्याने त्वरित माघार घेतली आणि मक्याच्या शेतात पसार झाला. या प्रसंगात वैशाली यांच्या अंगावरील साडी व ब्लाउज फाटल्याने थरारक दृश्य घडले.गोलू शिंगाडे या बालकाला ठार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा हल्ला झाल्याने खडांगळी परिसरातील ग्रामस्थ दहशतीत आहेत. विशेष म्हणजे या घटनेच्या वेळीच दुसरीकडे ओझर–शिर्डी विमानतळ मार्गावर ग्रामस्थ बिबट्याच्या बंदोबस्तासाठी रास्ता रोको आंदोलन करत होते. आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे बिबट्याचा पुन्हा हल्ला झाल्याने ग्रामस्थांचा संतापाचा उद्रेक झाला आहे.घटनेनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखालील वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संगमनेर व इगतपुरी येथून विशेष पथके बोलावण्यात आली असून तब्बल 60 कर्मचाऱ्यांचे पथक शोधमोहीम राबवत आहे. ड्रोन कॅमेरे, वेब कॅमेरे बसवून बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र अजूनही नरभक्षक बिबट्या जाळ्यात सापडलेला नाही.ग्रामस्थांचा संशय आहे की, गेल्या आठ दिवसांत घडलेल्या सर्व हल्ल्यांमागे एकाच नरभक्षक बिबट्याचा हात आहे. काही दिवसांपूर्वी मयत सारंग थोरात यांच्या घराजवळ बसवलेल्या कॅमेऱ्यांतही याच बिबट्याचा वावर दिसून आला होता.दरम्यान, सलग हल्ल्यांमुळे शेतकरी व ग्रामस्थांच्या मनात प्रचंड भीती पसरली असून, “बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, तोवर गावकऱ्यांचे जीव सुरक्षित नाहीत,” अशी आक्रोशपूर्ण मागणी होत आहे. खडांगळी, निमगाव देवपूर आणि परिसरात सध्या दहशतीचे साम्राज्य पसरले असून ग्रामस्थांवर मृत्यूचे सावट घोंगावत आहे.
