
नाशिक:-( प्रतिनिधी ) विचारशील जाणिवांनी समाज घडत असतो. प्रत्येक माणसाच्या निरीक्षण आणि अनुभवातूनच परिवर्तनवादी चळवळी उभ्या राहू शकतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक भालेराव यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात १८२वे पुष्प ‘काहूर’ या काव्यसंग्रहावर गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा जरांडे होत्या. भालेराव पुढे म्हणाले की, बदलत्या काळात तंत्रज्ञान, प्रगती, बदललेला माणूस, माणसातील माणुसकी, नीतिमूल्यांचा ऱ्हास, खालावलेली नैतीक पातळी, निसर्गापासून तुटत चाललेली माणसं, पाश्चात्य संस्कुतीचे अतिक्रमण, विभक्त कुटुंब, व्यसन, दारिद्रय अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करताना समाजातील अस्वस्थ करणारे प्रश्न विचार करायला लावतात. त्यातून कविता निर्माण झाली. शब्दांना वाट मोकळी करून दिली तरी मनातील काहूर काहीकेल्या संपत नाही. आर्थिक, सामाजिक, राजकीय शोषण व्यवस्थेविरुद्ध संताप मांडण्याचा प्रयत्न केला, असे सांगून संग्रहातील काही कविताही सादर केल्या. शाहीर विजय भोळे, संगीतकार भारत भालेराव यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर रविकांत शार्दूल यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (१६) सुमती टापसे ‘अनुत्तरीत प्रश्न’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
