
सिन्नर ( वसंत गोसावी, प्रतिनिधी)”ओबीसींच्या हक्कांवर कुणीही गदा आणली, तर तो आमच्या अस्तित्वावर केलेला घाला असेल…!” अशा भावनिक आवाहनासह सिन्नर तालुका बारा बलुतेदार व अलुतेदार महासंघाने आज मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात शासनाचा जाहीर निषेध नोंदवला. आम्ही मूळ कुणबींना आरक्षण देण्याच्या विरोधात नाही परंतु आमच्या ताटातील काढून इतरांना देणे हा अन्याय आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची तीव्र भावना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर ठसठशीतपणे उमटली होती.सिन्नर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार श्री. सुरेंद्र देशमुख यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

या वेळी वातावरणात एकच घोषणांचा गजर घुमत होता – “ओबीसींच्या हक्कांवर आघात, चालणार नाही… अन्यायाच्या निर्णयाचा निषेध असो…!”महासंघाचे नाशिक जिल्हा सचिव अनिलभाऊ सरवार, तालुका प्रमुख किरणभाऊ कोथमीरे, शहर प्रमुख विनोदभाऊ शितोळे, प्रमुख मार्गदर्शक दत्ताजी गोळेसर, रविंद्र गिरी, भैरवनाथ गोसावी, भानुदासभाऊ मेंगाळ, अशोकभाऊ सोनवणे, भाऊसाहेब पवार, दौलत हटकर, विनायक लहामगे, तुकाराम सदगीर, राजेश जाधव, विशालराव वेलजाळी, भाऊसाहेब शिलावट, सचिन आहेर, भिमराव चव्हाण, प्रकाश खारके, नवनाथ राजगुरू, एकनाथ देवकर, सुनिल देवकर, कैलास झगडे, निवृत्ती पवार, महेंद्र सांगळे, हेमंत देवनपल्ली, बंडू जाधव, विशाल चव्हाण, संजय सोनवणे, अशोक सोनवणे, महेंद्र कानडी, भगवान संत, ज्ञानेश्वर भालेराव, अशोक जाधव, सिकंदर पाबळे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.महासंघाच्या नेतृत्वाने दिलेल्या इशाऱ्यातून ओबीसींच्या हक्कांच्या रक्षणासाठी महासंघ “शेवटचा श्वास असेपर्यंत लढत राहील” असा ठाम निर्धार स्पष्टपणे उमटला.

शासनाने घेतलेला निर्णय मागे घेतला नाही, तर आगामी काळात हे आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या निषेधातून उभा राहिलेला जाज्वल्य संताप आणि न्यायासाठी उमटलेली हाक – ही केवळ सिन्नर तालुक्याचीच नाही, तर संपूर्ण ओबीसी समाजाच्या अस्तित्वासाठी पेटलेली ठिणगी ठरते आहे.
