
मायबाप’ कार्यक्रमात कविता सादर करताना कवी राजेंद्र उगले, अरुण इंगळे. निवेदक रवींद्र मालुंजकर आणि साथसंगत करताना अभिजीत वैद्य आणि प्रा.नरेंद्र जाधव.
नाशिकरोड:-(प्रतिनिधी ) ‘मायबापाची विसरू नका कीर्ती तेच आपले आभाळ आपली धरती सांभाळती दौलत लेकरांची… … जाळून जीवाच्या ज्योती… … …!’असं म्हणत मातापित्यांच्या आठवणींचा जागर करत ‘मायबाप’ या आईवडिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या संस्कारक्षम कार्यक्रमाचे आयोजन जेलरोड येथील साईराज बहुउद्देशीय संस्थेने गणेशोत्सवात करून समाजापुढे एक नवीन आदर्श घालून दिला. या कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस कविता सादर होत असताना उपस्थितांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. गणेशोत्सव काळात मातृपितृस्मृतींना हे अनोखे वंदन होते. राज्यभर गाजत असलेल्या अरुणराज प्रस्तुत ‘मायबाप’ या कार्यक्रमाच्या १९२व्या प्रयोगातून मातापित्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. कवी राजेंद्र उगले आणि अरुण इंगळे यांनी रसिकांसमोर मायबापाची एक-एक आठवण हळुवारपणे मोकळी करत रसिकांच्या डोळ्यात पाणी उभे केले. ‘बाप सोडून जाताना/सुन्या झाल्या दाही दिशा झाला पोरका भूगोल/आणि फाटला नकाशा!’अशा कवितेतून कवी राजेंद्र उगले यांनी स्वतःच्या कष्टातून उभा केलेला संसार आणि भरलेलं गोकुळ सोडून जाणाऱ्या बापाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या तर कवी अरुण इंगळे यांनी युवाकवी प्रशांत केंदळे यांच्यासमोर त्यांच्या सादर केलेल्या- ‘बाप मनात जपतो/लेक त्याची सोनपरी तरी जिवाचा जिवडा/देतो परक्याच्या घरी’या कवितेने साऱ्यांचेच डोळे पाणावले. निवेदनात कवी रवींद्र मालुंजकर यांनी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या ‘माय अंगुळ करिती, पाणी व्हात-व्हात जाई, थेट पंढरपुरात, त्याची चंद्रभागा होई…’ या कवितेसह आई-वडिलांचा जागर करणाऱ्या अनेक कवितांची पेरणी केली. मैफिलीतील कवी कमलाकर देसले यांच्या ‘आई तू शिकायला पाहिजे…,’ प्रा.राजेश्वर शेळके यांची ‘बूट आणि टाय,’ ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार मिठे यांची ‘काय देऊ पोरी तुला,’ काशीनाथ वेलदोडे यांची ‘झाडाच्या पानापानात,’ गझलकार गौरवकुमार आठवले यांची ‘दारिद्र्याच्या संसाराचे नंदनवनही करते आई…’ अशा विविध कवितांना श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. अभिजीत वैद्य (तबला) आणि प्रा.नरेंद्र जाधव (सिंथेसायझर) यांनी साथसंगत केली. सुभाष काजळे, सेवानिवृत्त तुरुंगाधिकारी हरिदास कुंटे, पोलीस अधिकारी प्रकाश निकम, विजय विशे, कामगारनेते प्रशांत कापसे, रामचंद्र शिंदे, अमृत राठोड, गणेश चिखले, ज्येष्ठ पत्रकार प्रा.भागवतराव गुरव, कवी राजू आतकरी यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थापक रोहित निर्मळ, समाजसेविका विजयता डावरे, युवानेते राहुल डावरे, भूषण बर्वे, हेमंत प्रधान, शुभम काजळे, अनुराग बर्वे, प्रथमेश माळी, स्वप्नील मोरे, अनिश चिंटू, कमलेश तेल्हुरे, प्रशांत कदम, प्रसाद साळवे, सूरज महाले आणि महिला मंडळाने आयोजन केले.
