
नासाका विद्यालयात पर्यावरणपूरक गणपती विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक अरुण पगार यांसह शिक्षक-कर्मचारी
नाशिकरोड:(प्रतिनिधी)- पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात पाच दिवसांच्या गणेशाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. विद्यालयात शाडू मातीपासून गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी गणेशाच्या मूर्ती साकारल्या. त्यानंतर विद्यालयात गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली. नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक अरुण पगार आणि शिक्षक-कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दिवस विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी आरतीसह प्रसादाचे नियोजन केले. विसर्जनावेळी गणेशाचे ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीने विसर्जनस्थळी आगमन झाले. विद्यार्थ्यांनी ‘एक-दोन-तीन-चार, गणपतीचा जयजयकार!’ अशासारख्या घोषणा देत वातावरणात चैतन्य निर्माण केले. तेथे पूजाअर्चा करून कृत्रिम तलावात गणपतीचे विसर्जन करून झाडांना निर्माल्य टाकण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
