
पेठवडगांव ( मारूती जाधव यांचेकडून ) येथील जयप्रकाश एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४—२५ मधील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. डॉ. अशोकराव मानेसाहेब (बापू) यांच्या हस्ते महाविद्यालयातील गुणवंत व किर्तीवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाची दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली. मराठी विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. पद्माकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. डिसले यांनी आपले महाविद्यालय शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असून ग्रामीण भागातील एक नामांकित महाविद्यालय हि या महाविद्यालयाची ओळख कायम ठेवली आहे याचा आपणास आनंद होतो असे नमूद केले. महाविद्यालयीन जीवनात अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकास व्हावा यासाठी महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धा व नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांचे व कार्यक्रमाचे आयोजन होत असते. त्यात विद्यार्थी मोठ्या आनंदाने व उत्साहाने सहभागी होतात व आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करतात तसेच स्पर्धेमध्ये यश मिळवतात. यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक व्हावे व त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हे प्रेरणादायी असतात असे मत आमदार साहेबांनी व्यक्त केले. व्यासपीठावरून बोलताना त्यांनी माने कुटुंबीयाशी असलेले ऋणानुबंध उलघडले व आपण महाविद्यालयाच्या विकासासाठी सहाय्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे नमूद केले. महाविद्यालयात असलेल्या शॉर्ट टर्म कोर्ससच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनेकविध कौशल्य आत्मसात करावीत असेही त्यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, श्री. सतिश माने साहेब यांनी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. शेषनारायण वडवे यांनी राज्यशास्त्र विषयातील पीएच.डी. ही पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करणेत आला. “पश्चिम महाराष्ट्रातील गोंधळी समाज- एक सामाजिक आकलन” हे पुस्तक प्रकाशित झालेबदल प्रा. डॉ. जयंत घाटगे तसेच डॉ. सर्जेराव पद्माकर यांनी लिहलेल्या “दलित साहित्य आणि स्त्रीवाद” या समीक्षा ग्रंथाला शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघामार्फत दिला जाणारा ‘सर्वोत्कृष्ट समीक्षा ग्रंथ’ पुरस्कार मिळालेबद्ल त्यांचा विशेष सत्कार करणेत आला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या करिअर कट्टा उपक्रमाच्या कोल्हापूर ग्रामीण जिल्हा समन्वयकपदी प्रा. शिवकांत पुपलवाड यांची निवड झालेबद्ल विशेष सत्कार करणेत आला. महाविद्यालयातील बी. ए. भाग तीन अर्थशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी कु. सुमती रमेश लठ्ठे हिची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. कुमार अनिकेत आनंद पवार याची सशत्र पोलीस दलात निवड झाली आहे. तसेच कु. संकेत निवृत्ती कदम, कु. अक्षय यशवंत सिद व कुमार आदित्य राजू कांबळे यांची निवड भारतीय सैन्य दलात झालेली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ४४ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात ‘नकला’ या कलाप्रकारात महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. नीता उत्तम कांबळे यांना उत्तेजनार्थ क्रमांक एक चे पारितोषिक मिळाले. या सर्व यशस्वी विद्यार्थांचा विशेष सत्कार लोकप्रिय आमदार मा. डॉ.अशोकराव माने साहेब (बापू) यांच्या हस्ते करणेत आला. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा इंग्रजी विभागप्रमुख डॉ. विलास चौगले यांनी ‘अहवाल’ वाचनात घेतला. क्रीडा व जिमखाना विभागप्रमुख डॉ. विशाल चव्हाण-पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष बिरनाळे यांनी केले. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. जी. बी. कांबळे (गुरुजी), संस्थेचे सचिव श्री. एस. एस. पाटील, संस्थेच्या संचालिका प्रमिलाताई माने, संस्था सल्लागार श्री. शशिकांत कसबेकर, कासारवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच मा. अचुत्य खोत तसेच वडगाव पंचक्रोशीतील मान्यवर, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
