
“.सिन्नर (प्रतिनिधी)– मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या “सुपर 50” या स्पर्धात्मक उपक्रमात मातोश्री चांडक कन्या विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. उन्नती उदय मुत्रक आणि अक्षदा साईनाथ कुलकर्णी या दोन्ही विद्यार्थिनींनी आपल्या मेहनत, जिद्द, चिकाटी आणि निरंतर अभ्यासाच्या जोरावर या उपक्रमात प्रवेशासाठी पात्रता मिळवून विद्यालयाचा मान उंचावला आहे. या यशामागे विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता कर्डीले, पर्यवेक्षिका श्रीमती सुवर्णा सोनवणे, स्टाफ सेक्रेटरी श्री. उत्तम भोये तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि अथक परिश्रम अनमोल ठरले आहेत. विशेषतः विज्ञान, गणित, इंग्रजी तसेच इयत्ता 10 वी ला शिकवणारे शिक्षक सुवर्णा सोनवणे, संध्या कुलकर्णी, प्रिया कुलकर्णी, मनीषा उकाडे, प्रतिभा वाढवणे तृषाली बोडके यांनी विद्यार्थिनींच्या सुप्त क्षमतांना चालना देत योग्य दिशेने मार्गदर्शन केले. त्यांच्या सर्जनशील मार्गदर्शनामुळे आणि कष्टपूर्वक घेतलेल्या मेहनतीमुळे हे अभूतपूर्व यश शक्य झाले आहे. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल शालेय समिती अध्यक्ष श्री. श्रीराम क्षत्रिय, पालक-शिक्षक संघ (PTA) उपाध्यक्ष श्री. गोरक्ष सोनवणे, शालेय समितीचे सर्व सदस्य तसेच पालक-शिक्षक संघाचे सर्व सदस्य यांनी विशेष कौतुक व्यक्त करून दोन्ही विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. उन्नती आणि अक्षदा यांच्या या यशामुळे मातोश्री चांडक कन्या विद्यालयाचे नाव आणखी उज्ज्वल झाले असून संपूर्ण शाळा परिवाराकडून दोन्ही विद्यार्थिनींना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
