

लासलगाव.(प्रतिनिधी ) लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेऊन इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे वाणिज्य शाखेतून घेऊन तृप्ती गांगुर्डे या विद्यार्थिनीने अतिशय अवघड समजली जाणारी सीए (चार्टर्ड अकाउंटंट) ची परीक्षा उत्तीर्ण केली. तर तिच्याच पावलावर पाऊल टाकत तिच्या लहान बहिणीने देखील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथूनच वाणिज्य शाखेतून शिक्षण घेत सीएस (कंपनी सेक्रेटरी) या परीक्षेत यश मिळविले आहे. लासलगाव सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन पहिल्याच प्रयत्नात तृप्ती ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) होऊन तर प्रीतीने देखील पहिल्याच प्रयत्नात कंपनी सेक्रेटरी (CS) होऊन इतिहास घडवला आहे. साधारणपणे सीए आणि सीएस या दोन्ही परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जातात. अनेकांना या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करावे लागतात, पण तृप्ती आणि प्रीती या दोघी बहिणींनी अपूर्व मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हे स्वप्न कमी वयात पूर्ण केले. लहानपणापासूनच दोघींनाही अभ्यासात प्रचंड आवड होती. इयत्ता बारावी मध्ये अकाउंट विषयात तृप्तीने 100 पैकी 100 गुण मिळवत वाणिज्य शाखेतून नासिक विभागात प्रथम येण्याचा मान मिळविला होता. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने मोठ्या जिद्दीने व संघर्षाने शिवणकाम करून मुलींचे शिक्षण पूर्ण केले. तृप्तीने बारावी नंतर सीए तर प्रीतीने बारावी नंतर सीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि आपल्या ध्येयावर प्रचंड लक्ष केंद्रित केले. दोघींच्याही यशामागे केवळ अभ्यास नाही तर शिस्तबद्ध दिनक्रम, योग्य नियोजन आणि अपयशाला न घाबरण्याची वृत्ती होती. तृप्ती नेहमी म्हणते की, “कितीही मोठं लक्ष्य असलं तरी मेहनत आणि सातत्य असेल तर काहीही अशक्य नाही.” तृप्ती आणि प्रीती यांनी आपल्या आईच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज केले आणि पहिल्याच प्रयत्नात तृप्ती सीए झाली तर प्रीती देखील पहिल्याच प्रयत्नात सीएस झाली आहे हे त्यांच्या यशाचे फलित आहे. काल मुंबई येथे पार पडलेल्या सीए च्या पदवीग्रहण समारंभासाठी तृप्ती आपल्या आई समवेत उपस्थित होती. ती सध्या बेंगलोर येथे PwC (PricewaterhouseCoopers) या कंपनीत सनदी लेखापाल म्हणून कार्यरत आहे. तर प्रीती सध्या लाॅ च्या अंतिम वर्षाला आहे सोबतच ती इंटर्नशिप देखील करत आहे. लासलगाव सारख्या ग्रामीण भागातून असलेल्या एकाच कुटुंबातील एक बहिण सर्वात तरुण सीए तर दुसरी बहीण देखील सर्वात तरुण सीएस बनते, हा प्रवास सोपा नव्हता. पण दोन्ही बहिणींनी हे दाखवून दिले की जर स्वप्नं मोठी असतील आणि मेहनत प्रामाणिक असेल तर यश नक्की मिळते.
