
कळवण(प्रतिनिधी ) सद्या जगभरात तंबाखू वापरामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे .तंबाखू हा कॅन्सर , मधुमेह, हृदयरोग,यांसारख्या आजारासाठी प्रमुख कारणीभूत घटक आहे. भारतामध्ये तंबाखूमुळे दरवर्षी 13 लाख लोक मृत्युमुखी पडतात व आजमितीला 27 कोटी लोक तंबाखूच्या विळख्यात सापडलेले आहेत. ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हे 2009 नुसार भारतात 15 वर्षाखालील तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्या मुलांचे प्रमाण हे 8.5 टक्के तर महाराष्ट्रात हे प्रमाण 5.1 टक्के एव्हढे आहे. तेव्हा तंबाखूमुक्त शाळांबरोबरच सर्व नागरिकांना व विद्यार्थ्यांनीही तंबाखू सेवनापासून प्रवृत्त करणे हे शिक्षकांसाठी पुण्यकर्माचे काम आहे, आणि याच पार्श्वभूमीवर आज दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी शासनाच्या तंबाखूमुक्त शाळा अभियान धोरणांतर्गत कळवण तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई – एव्हरेस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कळवण तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे कार्यशाळेचे आयोजन निसर्ग इंग्लिश मीडियम स्कूल मानुर ता. कळवण या शाळेत करण्यात आले होते. यावेळी कार्यशाळेसाठी तालुक्यातून एकूण २५४ शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. सदर कार्यशाळेत तालुक्यातील मुख्याध्यापक आपापल्या शाळा तंबाखूमुक्त होणे कामी सहभागी झाले होते. सदर कार्यशाळेत शासनाने शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी पारित केलेल्या ९ निकषांचे प्रशिक्षण श्री अजय चव्हाण यांनी दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. महाले साहेब हे होते,विद्यार्थी तसेच भावी पिढी ही तंबाखूजन्य पदार्थांच्या विळख्यात अडकू नये आणि व्यसनमुक्त राहावी यासाठी सर्व शाळा तंबाखूमुक्त होणे गरजेचे असून तालुक्यातील सर्वच शाळा तंबाखूमुक्त होतील असे मग मा. गटशिक्षणाधिकारी महाले सर यांनी मांडले त्यांनी सर्व शाळांना आपले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आव्हान देखील केले. उर्वरित शाळा ही लवकरच तंबाखूमुक्त होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था धोरण अभियान राबविण्यात येत असून संपूर्ण देशच तंबाखूमुक्त करणे कामी शिक्षकांची भूमिका निर्णायक व पवित्र ठरणार असल्याचे गौरोद्गार मत विस्तार अधिकारी चौधरी सरांनी मांडले. सदर कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी विस्तार अधिकारी श्री पी एस चव्हाण सरांनी कष्ट घेतले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आले. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री निलेश भामरे यांनी केले त्याचप्रमाणे सदर कार्यशाळेत विस्ताराधिकारी चौधरी साहेब केंद्रप्रमुख बागुल साहेब उपस्थित होते सदर कार्यशाळेचे आभार प्रदर्शन श्री गणेश कातकाडे यांनी केले.
