
अंनिस कार्यकर्त्यानाशिक (प्रतिनिधी). अंधश्रद्धा निर्मूलन हे अतिशय संवेदनशील ,जोखमीचे व सामाजिक जबाबदारीचे काम आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने प्रशिक्षित कार्यकर्ते असणे आवश्यक आहे. म्हणून पुढील काळात जास्तीत जास्त कार्यकर्ते मिळवणे व ते घडवण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षणावर अधिक भर देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा नाशिक जिल्हा प्रेरणा मेळावा व जिल्हा कार्यकारीणी निवड बैठकीत डॉ गोराणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की संघटना सक्षम व सशक्त होण्यासाठी शाखा सक्षम असावी लागते. शाखा सक्षम होण्यासाठी शाखेतील प्रत्येक कार्यकर्ता प्रशिक्षित असणे गरजेचे असते .त्यासाठी कार्यकर्त्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाशी निगडित वैचारिक व तात्विक विषय , कौशल्ये विकास, आधुनिक तंत्रज्ञान तसेच संघटना बांधणी याबाबतचे प्रशिक्षण देण्यावर पुढील काळात जास्त भर दिला जाईल. यावेळी पुढील दोन वर्षांसाठी जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया लोकशाही पद्धतीने संपन्न झाली त्याकामी डॉ. गोराणे व डॉ. सुदेश घोडेराव यांनी राज्य निरीक्षक म्हणून काम पाहिले. जिल्हा पदाधिकारी म्हणून पुढील कार्यकर्त्यांची सर्व सहमतीने निवड करण्यात आली. अध्यक्ष- सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. संजय वाघ, उपाध्यक्ष – सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे तसेच डॉ.शामसुंदर झळके, कार्याध्यक्ष – प्रा. आशा लांडगे, प्रधान सचिव- नितीन बागुल, जिल्हा बुवाबाजी संघर्ष सचिव- महेंद्र दातरंगे, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग – प्रमोद काकडे, विविध उपक्रम विभाग- विजय बागुल, महिला सहभाग विभाग – लता कांबळे, प्रशिक्षण विभाग- रवींद्र अहिरे, कायदेशीर सल्लागार – एडवोकेट सुशीलकुमार इंदवे, युवा विभाग- प्रथमेश वर्दे. सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग- बस्तीराम कुंदे. नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सर्वांनी अभिनंदन केले. त्यानंतर पुढील दोन वर्षात जिल्ह्यात करावयाचे उपक्रमात्मक काम आणि संघटनात्मक काम याबद्दल लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन, आराखडा तयार करण्याचे ठरले. या जिल्हा बैठकीसाठी जिल्ह्यातील अनेक शाखांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक व निवड प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी कृष्णा चांदगुडे , राजेंद्र फेगडे ,प्रल्हाद मिस्त्री, मिलिंद जाधव , विजय खंडेराव, अरूण घोडेराव, दिपक भालेराव आदींनी परिश्रम घेतले.
