
उरण दि १५(विठ्ठल ममताबादे )नवी मुंबई मधील तुर्भे नाका येथील हुसेन बीफ शॉप या मांस विक्री व्यवसायावर कारवाईची मागणी करत फरीद सिराजुल इस्लाम काजी यांनी नवी मुंबई महानगरपालिकेला पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी संबंधित दुकानाचा परवाना मार्च २०२५ मध्ये संपुष्टात आल्यानंतरही सदर ठिकाणी बेकायदेशीरपणे बीफ विक्री सुरू असल्याचा आरोप केला आहे.तक्रारदार फरीद काजी यांनी आपल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने २०२३-२४ या कालावधीसाठी हुसेन इमान शेख यांना बीफ विक्री परवाना वितरित केला होता. मात्र, परवान्याची मुदत मार्च २०२५ रोजी संपली असून देखील, संबंधित दुकानात सध्या

बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात बीफ विक्री सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार, परवान्याच्या अटीप्रमाणे केवळ १५० किलो मांस साठवण्याची व विक्रीची परवानगी असताना प्रत्यक्षात ५०० किलोहून अधिक मांस साठवून विक्री केली जात आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या निरीक्षण अहवालानुसार, दुकानाजवळच अवघ्या २० मीटर अंतरावर मुस्लिम धर्मियांचे मस्जिद असून, नियमानुसार किमान ५० मीटरचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे.याशिवाय माशी प्रतिबंधक व्यवस्था नसणे, दर्शनी भागात अपारदर्शक काच नसणे यासारख्या अटींचाही भंग झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सदर बीफ शॉपचे नूतनीकरण न करण्याची विनंती त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.या प्रकरणात त्वरित दखल घेऊन बीफ विक्रीचा परवाना रद्द करण्यात यावा व बेकायदेशीर विक्रीवर गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी फरीद काजी यांनी केली आहे. अन्यथा, मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही त्यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात दिला आहे.

