
लेखक
नवनाथ अर्जुन पा.गायकर
आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. आता स्वातंत्र्य मिळाले म्हंणजे काय झाले ? आपण पारतंत्र्यात होतो म्हंणजे नेमके काय होतो ? आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर नेमके आपण करतो काय ? किंवा काय बदल याचा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आढावा घेणे गरजेचे आहे.आणि याच बरोबर आपल्याला स्वातंत्र्य नेमके मिळाले का ? आणि मिळाले असेल तर ते नेमके कळाले तरी का ? हा ही संशोधनाचा विषय आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने ब्रिटनच्या धर्तीवर आधारीत लोकशाही व्यवस्था स्विकारली.खरेतर लोकशाही ही पद्धती प्राचीन भारताचीच संस्कृती होय.पण आपल्याला आपला पुरातन ठेवा किती महान आहे याची जाणीवच नाही.आयुष्यभर कस्तुरीचा वास कुठुन येतो हे शोधत कस्तुरीमृग वणवण भटकत असतो.पण मरेपर्यंत हा वास आपल्या बेंबीतुनच येतोय याची उकल त्यास होत नाही.
आपलंही तसेच आहे. लोकशाही पद्धती ही मुळात भारतीय देण आहे.पण आपणाला याची जाणीवच नाही.
रामायण,महाभारत व त्या नंतरच्या कालखंडात गणराज्याचां उल्लेख आहे. अगदी मोगली, मुसलमानी सत्तेचा अंमल या देशावर येण्यापुर्वीहूी सम्राट अशोक, हर्षवर्धन, चंद्रगुप्त मौर्य, सातकर्णी , बिंबिसार अशा कितीतरी सम्राटाचें कालखंडात ही गणराज्ये अस्तित्वात होती. व तिचा कारभार हा गणसभेने चालवला जात असे. पाश्चात्य राष्ट्रात मात्र या कालखंडात कठेही अशी गणराज्ये असल्याचे पुरावे सापडत नाही.
पण नेहमी प्रमाणे आपण भारतीय गावढंळ व पाश्चात्य लोक प्रगत या गुलामी मानसिकतेतुन लोकशाही व्यवस्थेचे जनकत्व उदारहाताने पाश्चात्य लोकानां बहाल केले.
आपण ब्रिटनची लोकशाही पद्धत स्विकारली.
खरेतर ब्रिटन हा देश अगदी चिमुकला आहे आकाराने.शिवाय या देशातील नागरिक व त्यांचे विचार याची आपल्या देशाबरोबर बरोबरीच होऊ शकत नाही.शेजारच्या बेडवर रुग्ण आहे.तो चांगला प्रगत, श्रीमंत वाटतो म्हणुन तो घेत असलेले गोळी वा औषध आपणही घ्यायचे ही भुमिकाच तत्कालीन नेत्यानीं घेतली हेच मुळी चुकिचे होते.
खरेतर ब्रिटनकडे बघुन धोरणे राबवतानां आपण तितकेच सक्षम व तयार आहोत का ? आपल्याला हे अनुरुप आहे का ? हे बघणे गरजेचे होते.पण इथे ही चुक झाली.किंवा असं म्हणु या कि धोरणे, योजना वा स्वप्ने खुप भव्य दिव्य होती पण दुर्दैवाने आपणाला ती राबवताच आली नाही.गांभीर्याने तिची अंमलबजावणीच झाली नाही. ना ती राज्यकर्त्यानी केली, ना ती प्रशासनाने केली.किंवा जनतेनेही त्या दिशेने रेटा वाढवलाच नाही.या तिन्ही घटकानीं म्हंणजे सरकार, प्रशासन व जनता सपशेल अपयशी ठरली. यात व्यवस्थेतील अन्य घटक ही जनता या प्रकारात आले.म्हंणजे प्रसार माध्यमे वगैरे, वगैरे .
या चुकिला आज अनेक फळे आलेली आहेत.अर्थात यात काही चांगली जशी आहेत तशी विषारी फळे देखील आहेत.
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या कालखंडात कणखर नेतृत्वाची गरज होती.पण दुर्दैवाने स्वप्नाळु व सौम्य प्रकृतीचे नेतृत्व या देशाला मिळाले.हे नेतृत्व उच्चभ्रु वर्गातील आणि परदेशात शिकुन आल्याने आपण हा हा म्हणता जादुची कांडी फिरवुन पाश्चात्य देशाप्रमाणे हा देश घडवु हा स्वप्नाळु आशावाद यांचे ठायी होता व त्याच दिशेने या नेत्यानीं अंधानुकरण केले.
पण आज ७८ वर्षानंतर मागे वळुन पाहतानां नेमके काय चित्र दिसते आहे? त्या कालखंडात जे प्रश्न थैमान घालत होते, तेच आजही आहे.दारिद्रय, महागाई, भ्रष्ट्राचार व राजकारणात माजलेली बजबजपुरी आजही आहे.
सत्तर ऐंशीच्या दशकात श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असल्याचा कालखंड.आणि आहे रे व नाही रे वर्गाचा त्या काळातील संघर्ष.
“टाटा, बाटा, सांगा आमच्या धनाचा वाटा कुठं आहे वो ?” हे तत्कालीन स्थिती व संघर्षाचं गीत किंवा “महंगाई डायन खात जावत है!’ हे संघर्षगीत आजही तंतोतंत लागु पडत आहे.फक्त नावे, संदर्भ बदलले आहेत. शोषित तेच आहे.
देश खरेच प्रगती पथावर आहे का ? कि आपण अजुन धडपडतोय ? आपण लोकशाही पद्धतीने यशस्वी झालोय का ? कि लोकशाहीचे काही दुष्परिणामही आपण भोगतो आहोत ?
१९४७ ला हा देश स्वतंत्र झाल्यावर या देशाने लोकशाही पद्धत स्विकारली.आणि सुदैवाने आजतागायत याच पद्धतीने हया देशाचा कारभार सुरु आहे. लोकशाही उलथवण्याचा गंभीर प्रयत्न श्रीमती इंदिरा गांधी यांनी आपल्या कालखंडात केला होता. पंडित नेहरु यांचे कालातही नेहरु म्हंणजे देश व देश म्हंणजेच नेहरु अशी अवस्था होती.ती पदोपदी जाणवत असली तरी किमान लोकशाहीचा बुरखा पांघरुन हे सगळं सुरु होतं.हा बुरखा इंदिरा गांधी यांचे काळात टराटरा फाडला गेला.आणि जाहिरपणे इंदिरा इज इंडिया व इंडिया इज इंदिरा अशा घोषणा निर्लज्जपणे होऊन लोकशाहीचे धिंडवडे काढले गेले.इंदिरा सरकारने लादलेली आणिबाणी हा कळस होता, तर भारतीय लोकशाहीच्या इतिहासात दिवसाढवळया लोकशाहीची हत्या झाली होती. सुदैवाने इंदिरा गांधी यांना सुबुद्धी झाली आणि त्या लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरे गेल्या.या निवडणुकीतील निकाल हा लोकशाहीचा कळसबिंदु म्हणावा असाच होता.पण सतरा पक्षाचां खिचडी कारभार पुन्हा सक्षम नेतृत्वाअभावी गांधी घराण्याकडे गेला.इतरानां सरकार चालवता येत नाही हा समज भारतीय जनतेला पटला कि काय कुणास ठाऊक, पुढील कालखंडात लोकशाहीचे नाव घेऊन अघोषित राजेशाहीच सुरु होती.राजा नसेल तर कळसुत्री बाहुली या देशावर लादली गेली व लोकशाहीचा मजाक उडवला गेला. पी.व्ही.नरसिंहराव, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी सारखे विद्वान नेते पायपुसणे बनवुन त्यांचे अवमुल्यन केले गेले.
आज मोदी राजवटीतही सत्तेचे केंद्रीकरणच झाले असुन, मोदी नावाभोवतीच देशाचं भविष्य बांधलं गेलं आहे.
भाजप वा मोदीचं एक बरं आहे, त्यांची धोरणे ही किमान स्पष्ट व जाहिरपणे सगळयानां अवगत आहे. अर्थात मोदी सरकार सरसकटच चुक वा बरोबर आहे असे नाही.पण हिंदु मुस्लिम दरी या देशात वेगाने वाढते आहे.गल्ली बोळात या द्वेषाचे लोण पसरले आहेत. यातुन एक तर तु, नाही तर मी राहिल अशी भुमिका तयार होत आहे.ही भुमिका घातक असुन, देश गृहयुद्ध किंवा फाळणीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
अर्थात याला कॉग्रेंस, भाजपसह सगळेच राजकिय पक्ष जबाबदार आहे. कॉग्रेस पक्षाने आपल्या सत्ताकाळात टोकाचे मुस्लिम प्रेम दाखवले.तर भाजप आज कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा चालवत आहे. या दोन्ही पक्षाबरोबर इतर पक्ष ही भरकटत कुठल्यातरी एका बाजुने उभे राहत आहे.सत्तेचा लोभ इतका वाढला आहे कि त्यासाठी राजकारणाने खालचे टोक गाठले आहे.इतकं टोकाचं राजकारण उदया भयावह अवस्थेला पेहचेल याची भिती आहे.
अर्थात या समस्येचं मुळ हे लोकशाही व्यवस्थेत आहे. लोकशाहीचे माध्यमातुन सरकार नावाची व्यवस्था जनतेने निवडायची आहे.दिसतानां इतकं छान दिसतं कि २१ वर्षाचा कोणताही नागरिक निवडणुक लढवुन व्यवस्थेचा भाग होऊ शकतो.पण याच व्यवस्थेचा भाग होण्यासाठीची निवडणुक प्रक्रियाच इतकी खर्चिक बनली आहे कि ती धनिक लोकाचीं बटिक बनली आहे.सामान्य माणुस त्या प्रक्रियेचा साधा विचारही आता करु शकत नाही. तर भाग घेण्याची गोष्टच दुर राहिली आहे.त्याच्याही मताचे मुल्य आता या धनिक लोकाच्यां हाती आहे, आणि ते सर्रासपणे विकत घेतले जाते, विकले जाते. हे जमिनीवरचे सत्य आहे.
त्यामुळे या मुळ सदोष प्रक्रियेतुन पुढे समस्या उकल होण्याची अपेक्षाच कशी करावी. ही मुळ प्रक्रिया भ्रष्ट्राचाराला जन्म देते, आणि पुढे यातुन अनेकानेक भानगडी जन्माला येतात.त्याबद्दल लिहणं, बोलणं इथे जागा पुरणारं नाही एवढं विश्वव्यापी आहे.
मताचं मुल्य काही समाजगटाच्या लक्षात आल्यावर त्यांनी जात,धर्म यातच हे जिरवल.यातुन दबावगट निर्माण झाले.आणि लोकशाही व्यवस्थेला वेठिस धरले आहे.
मुळात ही प्रक्रियाच वेठीस धरली गेल्याने तिचे परिणाम ही लुळे पांगळेच जन्मणार.
अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष, ब्रिटनचा माजी पंतप्रधान किंवा पाश्चात्य राष्ट्रातील अनेक राजकिय नेते पदावरुन खाली होताच उदरनिर्वाहासाठी चक्क नौकरी पाणी वा व्यवसाय करतात.भारतात राजकारण हाच व्यवसाय झाला आहे.इथला सटर फटर नेता व त्याच्या सात पिढया या एकदाच पदावर गेले तरी मालामाल होतात हे उघडं आश्चर्य आहे.आणि इथली जनता केवळ सोशल मिडीयावर या विरुद्ध लिहतेय.ते ही आडवळणाने नाव घेता.उघड संघर्ष करणे जाऊ दे नाव घेण्याचीही हिंमत गमावुन आपण षंड होत चाललोय हे वास्तव आहे.
समस्यांवर पान भरुन लिहु, फक्त करायचं तर आपण नाही ही मानसिकता आपली झालीय. आणि ती आपल्याला कुठे घेऊन जाईल हे देवच जाणो.आपलं सगळच असं सुरु आहे.कारण स्वातंत्र्य म्हंणजे काय हेच आपल्याला अजुन कळलेलं नाही.
वाघ पिंजर्यात असतो, तोवर त्याला खाणे पिणे जाग्यावर असते.पण स्वतंत्र झाला कि हालचाल त्यालाच करायची असते.नाही केली तर भुखेने अशक्त होऊन एक दिवस तो मरुन जाईल.
स्वांतत्र्याचा अर्थ ही तोच आहे. आपण सगळेच स्वतंत्र आहोत. आणि स्वातंत्र्य टिकवायचे तर आधी जगायला हवे.जगायचे तर मग टिकवण्यासाठी धडपडायला हवे.आपण धडपडच करत नाही आहोत. सगळी जबाबदारी दुसर्यावर टाकुन मोकळे झालो आहोत.त्यांनी हे करावं, यांनी ते करावं असा शहाजोगपणा करत इतरानां शिकवतोय.पण स्वत; काहीच करत नाही.उलट काही करण्याऐवजी आपण कुरतडतो आहोत.
स्वातंत्र्य ही आपल्याला कळाले नाही, आणि लोकशाहीही आपल्याला कळाली नाही. जगातली सगळयात मोठी लोकशाही असणारा देश म्हणुन आपण लावलेली टिगळे लपवत खोटा अभिमान मिरवत आहोत खरे, पण आमचा आजा १०० वर्ष जगला.पण केले काय ? तर बापजादयानीं कमावलेली सगळी मालमत्ता हा विकुन बसला.असा हा वृथा अभिमान आहे.आम्हाला तो ज्या दिवशी कळेल तो सुदिनच म्हणायचा.तो पर्यंत पाळलेली आपलीच माकडं उच्छाद मांडतच राहतील.
लेखक
नवनाथ अर्जुन पा. गायकर
आहुर्ली, पो.सांजेगाव
ता.ईगतपुरी, जि.नाशिक
मो.नं.९८८१३२९७०९
९७६३८२७७०८
