
सोनांबे (बातमीदार:) नाशिक येथील तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये सिन्नर व घोटीतील शिक्षकांनी आपला ठसा उमटवला आहे. प्रा. संजय पवार यांना राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, प्रा. आर. टी. सोनवणे, प्रा. डी. एम. ढोली, प्रा. कैलास काळे (सिन्नर महाविद्यालय) व बाळासाहेब डावरे (सरस्वती विद्यालय, घोटी) यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.या मानाच्या घोषणेनंतर महंत भामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, देवळा संचलित सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोटीचे अध्यक्ष डी. जे. पवार, घोटीचे सरपंच मनोहर घोडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाजी मांडे, मुख्याध्यापिका श्रीमती के. एस. सोनवणे, निता हेकरे आदींनी सर्व विजेत्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या गौरवामुळे सिन्नर आणि घोटीच्या शैक्षणिक विश्वात अभिमानाची भर पडली असून, शिक्षकांचे योगदान प्रेरणादायी असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
