
नाशिकरोड:- (प्रतिनिधी ) ‘घर-घर तिरंगा; हर-घर स्वच्छता… भारत माता की जय… वंदे मातरम्…’ अशा घोषणांनी नासाका कार्यस्थळावर प्रभात फेरीच्या माध्यमातून चैतन्य निर्माण झाले. निमित्त होते स्वातंत्र्यदिनाच्या अगोदरच्या दिवशी आयोजित केलेल्या उपक्रमाचे! नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळा ते कारखाना कार्यस्थळ या परिसरात प्रभातफेरी काढली. ढोल ताशांच्या गजरात हातात तिरंगी झेंडे आणि विविध घोषणा दिल्याने परिसर दुमदुमला. कारखाना कार्यालयाजवळ अधिकारी आणि कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून कौतुक केले. नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड आणि नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या उपक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार आणि सर्व शिक्षक-कर्मचारी वृंद यांच्यासह विद्यार्थ्यांनी केले.फोटोओळी:-स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आयोजित नासाका विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचे स्वागत करताना नासाकाचे अधिकारी आणि कर्मचारी. समवेत मुख्याध्यापक अरुण पगार आणि शिक्षक-कर्मचारी.
