
नाशिक:( प्रतिनिधी)- समाजाच्या संपन्न वाटचालीसाठी आधुनिक आणि पुरोगामी विचारांची आवश्यकता असते. कुठलीही क्रांती विचारांनीच होत असल्याने अशा विधायक विचारांमध्ये जग बदलण्याची ताकद असते, असे प्रतिपादन प्रा.डॉ.नारायण पाटील यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘शोध डॉ.शाम मानवांचा’ या पुस्तकावर १७१वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ.नानासाहेब बोरस्ते होते. प्रा.डॉ.नारायण पाटील पुढे म्हणाले की, समाजाला जागृत करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. वैज्ञानिक जाणिवा मानवी मनाचा वेध घेतात. साहित्यातून वैचारिकतेत वाढ होते. अंधश्रद्धानिर्मूलक साहित्यातून मानवी मूल्यांचे महत्त्व वाढते. असे विधायक विचार मांडणारे लेखन करून सामाजिक परिवर्तनासाठी डॉ.शाम मानव यांनी जनजागृती केली. स्वतःच्या घरावर तुळशिपत्र ठेवून त्यांनी समाज जागृतीचा वसा घेतला. आपल्या कार्याशी ते आयुष्यभर प्रामाणिक राहिले. मानसिक आरोग्य ढासळलेल्या अनेकांना त्यांनी जगण्याची दिशा दिली, असेही ते म्हणाले. डॉ.सुषमा दुगड आणि प्राचार्य डॉ.वेदश्री थिगळे यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन आणि मधुकर गिरी यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (१५) सुप्रसिद्ध कवी दिलीप पाटील ‘दुरून कुठून तरी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
