
लांबबर्डी ( साकोरा) येथे जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा साकोरा ग्रा.पं.सदस्या सौ.यशोदाताई डोळे ह्या होत्या. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. आदिवासी गौरव दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांबबर्डी येथे विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा विर एकलव्य, राघोजी भांगरे व आदिवासी संस्कृती याबद्दल भाषणे केली. तसेच विद्यार्थ्यांच्या चित्रकला, नृत्य व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अविनाश खोंडे यांनी आदिवासी गौरव दिनानिमित्त आदिवासींच्या योगदानाबद्दल माहिती सांगितली.आदिवासी समाज महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यांच्या योगदानाचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. आदिवासी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांची स्वतःची अशी वेगळी जीवनशैली, कला, आणि परंपरा आहेत, ज्या मराठी संस्कृतीला समृद्ध करतात. सर्व विद्यार्थ्यांनी आपली आदिवासी संस्कृती, परंपरा आणि ज्ञान यांचे जतन करणे, तसेच त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अमृतवृक्ष अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला.आदिवासी लोकांची निसर्गावर खूप श्रद्धा असते. ते निसर्गाला देवता मानतात आणि त्याची पूजा करतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी झाडाना राखी बांधून निसर्ग रक्षणाचा संकल्प केला.गजानन घाटाळे यांनी वक्तृत्व स्पर्धेचे तर युवा प्रशिक्षणार्थी श्रीमती मनिषा घाटाळे यांनी नृत्य व चित्रकला स्पर्धेचे परीक्षण केले. शिक्षक श्री. उमेश बोरसे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतांवर नृत्य करून आनंद घेतला. कार्यक्रमासाठी समिती अध्यक्ष नारायण भसरे, उपाध्यक्ष मनिषा गावित व इतर पालक उपस्थित होते.
