
दिंडोरी (प्रतिनिधी): शिक्षण आयुष्याची शिदोरी आहे, शिक्षणाने माणूस घडतो, माणुसकीने समाज घडतो. शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन सुशिक्षित व्हा, असे विचार प्रमुख पाहुणे भास्कर कदम यांनी दिंडोरी तालुक्यातील पिंपळनेर येथील पंडित धर्मा पाटील विद्यालयातील आपल्या भाषणात व्यक्त केले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष चिंतामण खांदवे होते.पिंपळणारे ग्रामपंचायतीच्यावतीने सदर शाळेस सीसीटीव्ही कॅमेरे प्रदान केल्याबद्दल तसेच ग्रामपंचायत सदस्य मनोज खांदवे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेयवस्तू भेट दिल्याबद्दल कृतज्ञता समारंभ सदर शाळेत आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक राजू राठोड यांनी कृतज्ञाता सोहळ्याचा हेतू आपल्या प्रास्ताविकात सांगितला.भास्कर कदम यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, ग्रामपंचायत पिंपळणारे यांनी शाळेस सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून दिले, हे कार्य खरोखर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने व सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसतात; परंतु या शाळेमध्ये ग्रामपंचायतीने केलेले कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय वस्तूंचे वाटप मनोज खांदवे यांनी केले, शाळेसाठी लोकसहभाग महत्वाचा असून हा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे आवाहनही कदम यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी केले.याप्रसंगी आर. के. खांदवे, बाळू जगताप यांची समयोचित भाषणे झाली. लोक सहभागातून शाळेचा दर्जा व विद्यार्थी यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्यध्यापक राजू राठोड व त्यांचे सहकारी जे परिश्रम घेत आहेत, त्यांचे कौतुक सर्वांनी केले. यावेळी कदम यांनी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे संपादित राजर्षी शाहू महाराज यांच्या पुस्तिकाच्या संचासह नांदगाव ते लंडन व उजेड पेरायचा आहे, ही पुस्तके भेट दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजू राठोड तर सूत्रसंचालन गायकवाडसर यांनी केले. प्रारंभी शालेय विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमासाठी गावातील सरपंच छगनरावजी कडाळे, उपसरपंच वैशालीताई खांदवे, सदस्य मनीषाताई शेखरे, विठ्ठल साळुंखे, ग्रामसेवक अहिरे मॅडम, शालेय समिती सदस्य सदू खांदवे, रामचंद्र खांदवे, ज्ञानदेव घाडगे, बाळाप्पा खांदवे, समाधान खांदवे, योगेश खांदवे, रमणलाल साळवे, प्रभाकर साळवे, समाधान शिरसाठ, द्वारकानाथ खांदवे, शिवाजी बोराडे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दिलीप साळवे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष दिलीप खांदवे इत्यादी उपस्थित होते. पालवीसर, ठाकरेसर, बहिरमसर,काळेमॅडम, चौधरीमॅडम यांचेसह समारंभ यशस्वीतेसाठी शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले.
