
नाशिक:-( प्रतिनिधी )प्रत्येक गावाच्या उत्कर्षासाठी अनेक व्यक्तींनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. अशा व्यक्तिमत्त्वांमुळेच गाव प्रगतिपथाकडे जात राहतं. गावात असणारी अशी सोन्यासारखी माणसं शोधता आली पाहिजे, असे प्रतिपादन कामगारभूषण पोपटराव देवरे यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘उमराणा भूषण’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दतात्रय जाधव यांनी होते. ते पुढे म्हणाले की, गावाचा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून लिहिल्यामुळे भविष्यात अनेक युवक पीएच.डी करू शकतील, असा ग्रंथ निर्माण झाला आहे. आयुष्यात एखादे काम असे करायचे, की त्यामुळे आपल्यासह आपल्या गावाचे नाव आयुष्यभर गौरवांकित राहील, असे काम करायचे म्हणून या ग्रंथाची निर्मिती केली. या ग्रंथासाठी गावातील अनेक अनुभवांचे विद्यापीठ असणाऱ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिकांची मदत झाली. त्यांच्याकडील अनुभवाची शिदोरी उपयोगाला आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, पु.ल.देशपांडे, पंतप्रधान चंद्रशेखर, स्वाध्यायसूर्य पांडुरंगशास्त्री आठवले, सुनील दत्त यांनी उमराणे या गावाला भेटी दिल्या आहेत. मालेगावचे पहिले खा.यादवराव जाधव, वसाका कारखाना निर्मितीचे शिल्पकार ग्यानदेवदादा देवरे याच भूमीचे पुत्र असल्याने या गावचे कर्तृत्व आणि नेतृत्व या माध्यमातून मांडता आले; याचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले. योगेश कापडणीस आणि विलास गोडसे यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर वैजयंती सिन्नरकर यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (दि.१२) प्रा.डॉ.नारायण पाटील ‘शोध डॉ.शाम मानवांचा’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
