
संकलन व लेखन -श्री.शंकर नामदेव गच्चे जि.प.प्रा.शा. वायवाडी केंद्र पोटा बु. तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड पिन नंबर – 431802नंबर- 8275390410
क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० मध्ये सांगली जिल्ह्यातील व हेबोरगाव येथे झाला. क्रांतिसिंह नाना पाटलांच पूर्ण नाव नाना रामचंद्र मिसाळ असे होते.सांगली जिल्ह्यातील येडमच्छिंद्र हे त्यांचे मूळ गाव. लहानपणापासून नानांना दणकट शरीर यष्टी लाभली होती. त्यांना वाळवा खूपच आवडत असल्यामुळे ते वाळव्यातच असायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली नंतर समाजकार्याच्या आवडीने नोकरी सोडली व १९३० च्या दरम्यान सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला.१९४२ च्या चळवळीत ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र अमलात आणले त्यातूनच त्यांनी प्रतिसरकार ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. नानांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालय,अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखे कामे केली जात.१९४३ ते १९४६ या काळात सातारा आणि सांगली जिल्ह्यात सुमारे १५०० गावात भूमिगत चळवळीच्या माध्यमातून प्रतिसरकाररे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वात कार्यरत होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून त्यांनी इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले होते. पत्री सरकार या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला. नाना पाटील यांचे महाराष्ट्रातील क्रांतीकारी चळवळीला मोठे योगदान आहे. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण भागात ब्रिटिशांचं अस्तित्व नाममात्र राहिलं. नाना पाटील यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केलं. त्यांच्या या कार्यामुळेच ते क्रांतीसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान भारतीय जनता कधीही विसरणार नाही. स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबरोबरच त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे.काही माणसं एकट्याने मोठी होतात. काही माणसांना समाज मोठा करतो. तर काही माणसांमुळे समाज मोठा होतो. ज्या माणसामुळे समाज मोठा झाला अशा माणसांमध्ये क्रांतीसिंहच नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल. गोविंदराव पानसरे यांची हत्या झाली त्याच सुमारास क्रांतिसिंह नाना पाटील भूमिगत अवस्थेतून बाहेर आले. त्यांनी मराठवाड्याच्या सीमा भागात झंजावाती दौरा सुरू केला. नाना पाटील उघडपणे निजामांच्या गाड्यातून जाणारा खजिना लुटा. बंड करा असे आव्हान करीत. सरहद्दीवरील त्यांच्या भाषणांना हजारोंच्या संख्येने लोक येत. खरोखरच सरकारी खजिन्यांवर धाडी पडू लागल्या. पोलीस ठाणे जाळली जाऊ लागली. रझाकार केंद्रांवर हल्ले होऊ लागले. पोलिसांशी सशस्त्र मुकाबला होऊ लागला. सातारच्या प्रतिसरकारच्या धरतीवर ग्रामराज्य स्थापन होऊ लागली. कार्यकर्त्यांनी मराठवाडा व तेलंगणा विभागात शेकडो ग्रामराज्य स्थापन केली. या ग्रामराज्य आंदोलनाला क्रांतीसिंह नाना पाटलांची प्रेरणा लाभली होती. स्वातंत्र्याचा संदेश अक्षरशः माज घरापर्यंत पोहोचला होता. मराठवाड्यातील कित्येक खेड्यातील स्त्रिया दळताना ओवी म्हणत. पहिली माझी ओवी ग! क्रांतीसिंह नानाला!! धाक देऊन पळविला तांबड्या ग साहेबाला! आयाबाया विनविती धडा दे रे रझविला!! मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या योगदानाची सर्व माहिती कथा स्वातंत्र्याची लेखक- कुमार केतकर यांच्या पुस्तकातून संकलित केली आहे.( पेज नंबर -३२०-३२१ ) संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला सुद्धा क्रांतिसिंह नाना पाटलांचे खूप मोठे योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९५७ मध्ये ते सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तर १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून बीड मतदार संघातून निवडून गेले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार आहेत. असा हा महान नेता ६ डिसेंबर १९७६ रोजी काळाच्या पडद्याआड गेला. वाळवा येथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. अशा या महान नेत्याला कोटी कोटी प्रणाम
