
ओझर: मविप्रचे आद्य संस्थापक कर्मवीर कै रावसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करताना मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपस्थित उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील सर्व शिक्षक व विद्यार्थी आदी
.ओझर: दि.१३ (वार्ताहर) येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर कै रावसाहेब थोरात यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. याप्रसंगी कर्मवीर कै रावसाहेब थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील ज्येष्ठ शिक्षिका मंगल सावंत सरोज खालकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जीवन कार्यावर विद्यार्थ्यांनी भाषणे केली.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी, कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जीवनकार्याची माहिती देतांना, ब्रिटिश काळात अज्ञानी व अडाणी बहुजन समाजाला शिक्षणाविषयी फारसे ज्ञान अथवा महत्व नव्हते. ही बाब कर्मवीर रावसाहेब थोरात यांना खटकत होती. त्यांनी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या उभारणीसाठी कर्मवीर काकासाहेब वाघ, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मुरकुटे, गणपतदादा मोरे, कीर्तीवान निंबाळकर, डी आर भोसले आदींच्या सहकार्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शैक्षणिक चळवळ उभारून सुरुवातीस देणगीच्या स्वरूपात मिळेल त्या निधीतून नाशिक येथे उदोजी मराठा वसतीगृहाची स्थापना करून हळूहळू जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयांची पायाभरणी केली. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या उक्तीप्रमाणे बहुजनांच्या शिक्षणासाठी प्रचार व प्रसाराचे कार्य केले. प्रारंभी धारचे राजे श्रीमंत उदाजी पवार यांनी देणगी देत संस्थेच्या उभारणीसाठी मोलाचा हातभार लावला. आज त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे त्यांनी भाषणात सांगितले. कला शिक्षिका मोनाली निकम यांनी होलीकोत्सवा निमित्त फलक रेखाटन करून विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले.
