
लासलगाव ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर च्या नियमित कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा महाविद्यालयाचा कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी आज शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या शुभहस्ते आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, श्री.किशोर गोसावी, श्रीमती लता तडवी, श्री जितेंद्र देवरे, श्री महेश होळकर, श्री.रामनाथ कदम, क्रीडा संचालक श्री.गणेश जाधव इ. उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, तरुणाईचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, स्वच्छतेचे दूत संत गाडगेबाबा आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आणाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कु. पूजा खैरे व गृपने स्वागत गीताने अतिथींचे स्वागत केले. त्यानंतर रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र भांडे यांनी प्रास्ताविकातून रा.से.यो. ची भूमिका व राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित व विशेष श्रमसंस्कार शिबीर कार्यक्रमाचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून संस्कारी युवक घडत असल्याचे नमूद केले तसेच समाजसेवेचे हे व्रत अंगीकारून युवक राष्ट्रसेवेच्या कामी येऊ शकतो असे प्रतिपादन यावेळी केले. तसेच पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे हे व्रत स्वयंसेवकांनी अंगीकारले तर आपण देखील देशसेवेच्या कामी येऊ शकतो असे सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री.किशोर गोसावी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शिस्तीचे पालन करून उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून घडावे असे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे यांनी अध्यक्षीय समारोप करताना सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास स्वयंसेवकांसमोर मांडला तसेच राष्ट्रीय सेवा योजनेबद्दल माहिती स्वयंसेवकांना देऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवक कशा पद्धतीने घडले आहेत हे सांगितले. देवाने आपल्याला जे दोन हात दिलेले आहे त्या दोन हातांनी मिळून आपण जर काही निस्वार्थपणे दान करू शकत असाल तर ते म्हणजे समयदान आणि आपण आपला समय या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजसेवेसाठी दान करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुनिल गायकर यांनी केले. तर आभार श्री.देवेंद्र भांडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता एनएसएस गीताने झाली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
