
वडांगळी.(प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच अभिनव बालविकास मंदिर वडांगळी या विद्यालयात मविप्र समाज संस्थेचे आधारस्तंभ माजी सरचिटणीस, माजी अध्यक्ष कर्मवीर ॲड. बाबुरावजी ठाकरे साहेब व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार हे होते. यावेळी व्यासपीठावर ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख विलासराव तांबे, अभिनव बाल विकास मंदिर विभागप्रमुख शीला आवारे, शंकरराव सांगळे, विजय कोकाटे, कैलास काळे, भाऊसिंग पंढुरे, सुभाषराव ठोक, संदीपराव म्हस्के संदीप वारुंगसे, राजेंद्र गीते प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली . व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कर्मवीर ॲड. बाबुरावजी ठाकरे साहेब व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी धनश्री कोकाटे, राधिका सांगळे, प्रज्ञा बोराडे या विद्यार्थिनींनी कर्मवीर ॲड बाबुरावजी ठाकरे व यशवंतरावजी चव्हाण यांच्या कार्यावर आधारित भाषणे केली. शिक्षक मनोगतात शंकरराव सांगळे म्हणाले की, मविप्र संस्थेसाठी अहोरात्र झटणारे नेते व प्रसिद्ध सरकारी वकील, न्यायासाठी झटणारे द्रष्टे समाजकारणी अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कार्यातून राजकारण व समाजकारणाचा ठसा उमटवला असे ते म्हणाले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना बाळासाहेब खैरनार म्हणाले की कर्मवीर ॲड. बाबुरावजी ठाकरे साहेब यांनी मविप्र संस्थेचे सरचिटणीस व अध्यक्ष ही महत्त्वाची पदे भूषविली. शिक्षण व न्याय क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून त्यांना ओळखले जाते. कर्मवीर ॲड. ठाकरे साहेब कडक शिस्तीचे व वक्तशीर होते. बाहेरून अत्यंत कडक वाटणारे ठाकरे साहेब आतून अतिशय मृदू होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे उत्कृष्ट संसदपटू व उदारमतवादी, एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी सह्याद्रीचे वारे ,कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही पुस्तके लिहिली. ते राजकारणी व रसिक साहित्यिक म्हणून प्रसिद्ध होते. असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब आडसरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कैलास काळे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
