
*नाशिक (प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू मराठा हायस्कूल नाशिक मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व कर्मवीर बाबुराव ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे हे होते.व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रम इयत्ता नववी ब या वर्गाने सादर केला. विद्यार्थी मनोगतातून तनुजा गोसावी, समृद्धी पाटील यांनी त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.अध्यक्ष मनोगतातून ज्ञानेश्वर शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी १ मे १९५८ रोजी धुम्या गडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व राष्ट्रसंत भगवानबाबांच्याच्या समोर धूम्या गडास भगवानगड नाव दिले. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे हे सांगितले तसेच ‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन सर्वच कर्मवीरांनी १९१४ मध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची स्थापना केली. आज १०० वर्षांनंतर या संस्थेच्या फळा-फुलांनी डवरलेल्या वटवृक्षाच्या छायेत आपण अध्ययन, अध्यापनाचा आनंद लुटत आहोत. आद्य कर्मवीरांनी तन-मन-धन अर्पण करून लावलेल्या या वटवृक्षाचा विस्तार खऱ्या अर्थाने दुसऱ्या फळीतील कर्मवीरांनी केला. त्यापैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे शिक्षण व न्यायक्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून ओळखले जाणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व कर्मवीर अॅड. बाबूराव ठाकरे यांचा जन्म गणूर या छोट्याशा गावातील सधन व प्रगतिशील शेतकरी गणपतराव धोंडिराम ठाकरे व राहिबाई ठाकरे या दांपत्याच्या पोटी १२ मार्च १९२६ ला झाला. खाऊन-पिऊन सुखी असलेल्या या घरात बहीण-भाऊ धरून १२ भावंडे होती. त्यात बाबूरावांचा आठवा नंबर. जणू गोकुळातील श्रीकृष्णच. बाबूराव आई-वडील व भावंडांचे अत्यंत लाडके, परंतु अत्यंत हट्टी व खोडकर होते. लहानपणी त्यांना हातात चाबूक घेऊन खेळण्याची सवय होती व खेळता-खेळता काही कारणाने राग आला, तर ते सोबतच्या भावंडांना व मित्रांना चाबकाचा प्रसाद देत. सर्वजण त्यांच्यावरील प्रेमापोटी ते सहन करीत. मुलाचे पाय पाळण्यात दिसत होते. कारण याच मुलाने मोठेपणी अन्याय व अत्याचाराविरुद्ध फटकारे मारण्याचे काम केले हे सांगितले.कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन रुपाली शेडगे यांनी केले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.सुत्रसंचलन अनुष्का सोनजे,अक्षरा दाभाडे यांनी तर आभार नेहा पाटील हिने मानले.फोटो -न्यू मराठा हायस्कूलमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व कर्मवीर बाबुराव ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करतांना उपस्थित मान्यवर आदी.
