
लासलगाव ( प्रतिनिधी )येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे माजी उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार व सर्व शिक्षकांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले व जयंती साजरी करण्यात आली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांच्या नावाचा विशेष उल्लेख केला जातो ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. एक सुसंस्कृत राजकारणी, थोर विचारवंत, आदर्श लोकप्रतिनिधी, मनस्वी लेखक, सचोटी, नेकी आणि निष्ठेचा वसा देणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्नंच होते. त्यांची जयंती समता दिन म्हणून साजरी केली जाते. याप्रसंगी रा.से.यो. स्वयंसेवक ओंकार निकम या विद्यार्थ्याने यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्यावर माहिती सांगितली तसेच श्री.उज्वल शेलार यांनी देखील यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज शर्मा या विद्यार्थ्यांने केले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रम कार्यक्रम अधिकारी श्री.देवेंद्र भांडे, श्री.सुनिल गायकर व रा.से.यो. स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
