
( वावी ता.सिन्नर जि. नाशिक ) एका आदर्श शिक्षकाची यशोगाथागेल्याच आठवड्यात ज्यांचा देह अनंतात विलीन झाला ते म्हणजे *दिवंगत यशवंत सहादु गवळी* ( *गवळी गुरुजी* ) जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी. त्यांचा काल दशक्रिया विधी संपन्न झाला, ते केवळ एक शिक्षक नव्हते, तर ते होते एक अथांग ज्ञानवृक्ष, ज्यांच्या सावलीत अनेक पिढ्या वाढल्या आणि फुलल्या. एका प्राथमिक शिक्षकाच्या भूमिकेतून त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर जीवनाचे आणि माणुसकीचे धडे दिले. त्यांच्या जाण्याने केवळ एका कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण गावाला आणि त्यांनी घडवलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पोरके केल्याची भावना आहे. त्यांनी आपले जीवन शिक्षण आणि समाजसेवेसाठी समर्पित केले. ‘ शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचं माध्यम नाही, तर ते एक सशक्त समाज घडवण्याचं साधन आहे,’ हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यांच्या शिकवणीतून अनेक विद्यार्थी उच्च पदांवर पोहोचले, अनेक यशस्वी उद्योजक बनले, तर काही जबाबदार नागरिक म्हणून समाजात वावरत आहेत. ते नेहमी म्हणायचे की, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक सुप्त क्षमता असते आणि शिक्षकाचे कार्य ती क्षमता ओळखून तिला योग्य दिशा देणे हे आहे. त्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ शाळेपुरती मर्यादित नव्हती. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य यावे या उदात्त हेतूने…. वावी परिसरामध्ये त्यांनी एक पतसंस्था स्थापन केली. सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण शेतकरी पतसंस्था या संस्थेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत मिळाली, ज्यामुळे अनेकांना संकटातून बाहेर पडता आले आणि त्यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण झाला. त्यांची ही दूरदृष्टी आणि शेतकऱ्यांबद्दलची कळकळ यामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘शेतकऱ्यांचे कैवारी’ बनले होते. त्यांच्या आदर्शवादी विचारांचा प्रत्यय त्यांच्या निधनानंतरही दिसून आला. गुरुजी स्वतः निसर्गप्रेमी होते पर्यावरणाचे महत्त्व ओळखून, त्यांनी आपला अंत्यविधी पारंपरिक पद्धतीऐवजी झाडे वाचवण्यासाठी दृष्टिकोन ठेवून त्यांनी पूर्वीच आपल्या मुला मुलींना सांगितले होते. गायीच्या गोवऱ्यांमध्येच अंत्यविधी व्हावा ही त्यांची इच्छा होती व तसे करण्यास सांगितले. हा त्यांचा निर्णय खरोखरच दूरगामी संदेश देणारा होता. वृक्ष वाचले पाहिजे वृक्ष वाचले तर देश वाचेल हे त्यांचे विचार होते. त्यास विचार प्रेरणेतून वावी गावामध्ये त्यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी, त्यांच्या दोन्ही मुलांनी विजय यशवंत गवळी व योगेश यशवंत गवळी त्यांच्या वडिलांचा आदर्श स्मरणार्थ राहावा या दृष्टिकोनातून वावी गावात आलेल्या पाहुण्यांना आणि शेतकऱ्यांना चारशे ते पाचशे आंब्याचे वृक्ष वाटप करण्यात आले. हे वृक्षारोपण केवळ एक विधी नव्हता, तर तो त्यांच्या पर्यावरणाविषयीच्या भावनेतून निसर्ग वाचला तर पर्यावरण वाचेल आणि पर्यावरणाचा समतोल राहिला तर देश टिकेल या भावनेतून वृक्षारोपण वाटप करण्यात आले, वाटप केलेल्या वृक्षांमुळे भावी पिढ्यांसाठी एक हरित क्रांती व हरित भविष्य भविष्य घडवण्याच्या त्यांच्या संकल्पाचा प्रतीक होता.त्यांचे जीवन हे त्याग, समर्पण आणि समाजसेवेचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले की, एक व्यक्ती किती मोठ्या प्रमाणात समाजाला प्रभावित करू शकते. त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांनी घालून दिलेला आदर्श हा कायमच आपल्या स्मरणात राहील आणि अनेकांना प्रेरणा देत राहील.आपल्या काकांच्या या महान कार्याला विनम्र अभिवादन! *शब्दसुमनांनी हरित अदरांद्धांजली* 🌳🎄🙏💐 *शब्दांकन – सुनील गवळी सर नासिक.*
