
नाशिक:- (प्रतिनिधी ) बालपणापासून आपण मातापिता, गुरुजन यांच्यापासून शिकत जातो. एकमेकांचं मन जपलं की आयुष्य सुंदर होतं. अशाच प्रकारे मनोमनी भाव जपणाऱ्या उत्तम संस्कारांनीच आपली जडणघडण होते, असे प्रतिपादन नांदगाव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.सुरेश नारायणे यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात १६५वे पुष्प गुंफताना ते ‘मनोमनी’ या पुस्तकावर बोलत होते. केशव पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रा.नारायणे पुढे म्हणाले की, समाजाशिवाय आपण परिपूर्ण होऊ शकत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत मानवी नात्याचे बंध जोडलेले असतात. मनातील विचार चांगले असले तर माणूस मनोमनी प्रगल्भ होतो. मानवी मनाची जडणघडण, मनाची घालमेल वेगवेगळी असते. मनातील वेदना, दु:ख, भावनांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला तर मन जाणता येतं. मनाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मानवी मनातील विषय वेगवेगळे असले तरी मनापासून मनापर्यंत पोहचण्यासाठी मनात पावित्र्य असल्याशिवाय आनंदी मनाची माणसं तयार होत नाही, असेही ते म्हणाले. डॉ.टी.आर.गोराणे, प्रा.एम.एस.दिवटे यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. तर अलका दराडे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (२९) मालेगाव येथील निंबा भागा निकम ‘गिरणाई’ या पुस्तकावर बोलणार आहेत.
