
सटाणा (ता. बागलाण) – मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, सटाणा येथे ‘सखी सावित्री’ आणि ‘विद्यार्थी सुरक्षा समिती’ अंतर्गत विद्यार्थिनींसाठी उपयुक्त आणि जागरूकतेपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सटाणा पोलीस स्टेशनचे पी.एस.आय योगेश बोरसे-पाटील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना डिजिटल युगातील वाढत्या धोक्यांविषयी सखोल मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, मोबाईलचा गैरवापर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक माहिती शेअर करताना घ्यावयाची खबरदारी, अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळणे, ओटीपी कोणालाही शेअर न करणे यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट आणि प्रभावीपणे चर्चा केली.सायबर गुन्हे कसे घडतात, त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याविषयीही त्यांनी विद्यार्थिनींना उपयुक्त उदाहरणांसह माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी रस्ता वाहतूक सुरक्षेचे नियम समजावून सांगितले. देशात वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियम पाळणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी विद्यार्थिनींना पटवून दिले.आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थिनींनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, वाचन करावे, विशेषतः थोर महापुरुषांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्रथम महिला संचालिका शालन ताई सोनवणे होत्या. याशिवाय माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष श्री. बी. एस. सूर्यवंशी, विद्यालयाच्या प्राचार्या सौ. संगीता सोनवणे, पर्यवेक्षक श्री. ढेपले सर यांची उपस्थिती होती.सदर कार्यक्रम सखी सावित्री समिती प्रमुख श्रीमती ए. जे. पवार व विद्यार्थी सुरक्षा समिती प्रमुख श्रीमती व्ही. ए. खैरनार यांच्या संयोजनाखाली पार पडला. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या
