
मखमलाबाद विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करताना करतांना प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी.
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील यांच्या शुभहस्ते महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षकवृंद उपस्थित होते.इयत्ता ७ वी क व इ.१० वी ड या वर्गांनी कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे नियोजन केले होते.कु.चैताली पाटील,कु. कृतिका थवील कु.ज्ञानराज पवार यांनी प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील,ज्येष्ठ शिक्षक प्रताप काळे, ज्येष्ठ शिक्षिका योगिता कापडणीस यांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण केले व त्यांना भेटकार्ड,गुलाबपुष्प,पेन देऊन त्यांचा सत्कार केला.

.तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक,सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाबपुष्प,पेन आदी शैक्षणिक वस्तू भेट देऊन सर्वांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले.त्यांनी प्रास्ताविकात गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केले.गुरुचे आपल्या जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंबद्दल आदर बाळगावा असेही त्यांनी शेवटी सांगितले.कु.वैष्णवी आहेर,कु.समीक्षा बोडके,कु.ज्ञानराज पवार यांनी गुरुपौर्णिमेबद्दल सविस्तर माहिती दिली.आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा यालाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.गुरु पौर्णिमा म्हणजे गुरूंचे स्मरण, पूजन व महती सांगणारा दिवस.पूर्वीच्या काळी गुरुग्रही राहुन गुरु सांगतील ती कामे करून ज्ञानग्रहण केले जात.गुरु व शिष्य यांच्यामध्ये कमालीचा आदर होता.गुरु या शब्दाचा अर्थच महान आहे.

अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे काम गुरु करतात.परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे जसे सोने होते, तसेच गुरुचे ज्ञान ग्रहण केल्यावर जीवनाचे सोने होते. पूर्वीच्या काळी राजदरबारातही गुरूला अनन्य साधारण महत्त्वाचे व मानाचे स्थान होते.खुद्द राजे हे गुरूंना मान देण्यासाठी सिंहासनावरून उठत असत.खरे तर निसर्ग सुद्धा मोठा गुरु आहे. निसर्गच आपणास अनेक गोष्टी शिकवीत असतो.कळीचं फुलात रूपांतर करायला अख्खी रात्र घेणारा निसर्ग आपल्याला धीर धरायला सांगत असतो.ज्येष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे यांनी प्राचीन परंपरेतील गुरु शिष्य यांचे नाते स्पष्ट करून सांगितले.गुरु शिष्य नात्याची परंपरा वर्षांनूवर्ष चालत आली आहे.गुरु कोणालाही करता येत असतो.पर्यवेक्षक सुनील पाटील यांनी गुरुपौर्णिमेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचा पहिला गुरु म्हणजे त्याची आई असते.आई-वडील पहिले गुरू असतात व ते जीवनाला आकार देण्याचे काम करतात.कु.शंभवी जगताप व कु.नेहा भामरे यांनी गुरुपौर्णिमेबद्दल अतिशय सुंदर असे गीत गायन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.चैताली पाटील, कु.कृतिका थविल,कु.उत्कर्षा बांगर यांनी केले आभार प्रदर्शन वैशाली भरवाड,कु.समीक्षा बोडके यांनी केले.इ.७ वी क च्या विद्यार्थिनींना ज्येष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे व इ.१० वी ड च्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शिक्षिका योगिता मोगल यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.*
