परिक्षक:-प्रकाश रामचंद्र क्षीरसागर ९०११०८२२९९

– अंतर्मुख करणाऱ्या कविता पहिलीच कविता अंतर्मुख करणारी आहे. त्या म्हणतात, बुडत्यास दे किनारा दुबळ्यास दे निवारा गाठीस बांधुनी घे । सात्विक तू कमाई जीवनाची खरी कमाई काय असेल तर ते म्हणजे पुण्य. काळोखात बुडलेल्या घराला चांदण्याची झिलाई दे. अत्यंत सात्विक भावनीं भरलेली ही कविता. दुसऱ्या ‘काजळखुण’ या कवितेत त्या स्त्रीला समाजापासून सावध करतात. काजळाची खुण लावली म्हणून निर्धास्त अशी राहू नको तूच तुझा भरवसा आहेस. लाख नजरांचे तीर तुला घायाळ करतील .पाऊस तोच आहे परंतु नितळशी जळरास मात्र ती गढूळत आहे. शहाऱ्यांची निकोपता लोप पावणारी वाऱ्याची झुळूक आहे. याचक मागतच असतो पण त्यात विनम्रता नाही. तो आता सालस राहिला नाही. संस्कृती प्रदूषित झाली आहे. सद्यःस्थितीवर प्रहार करणारी ही कविता आहे. सूर्यप्रकाश तोच असला तरी प्रकाशाची वसाहत मात्र काजळली आहे. उतरली नभांतून माळ आणि श्रावण या दोन्ही कविता निसर्गावर आहेत. हा श्रावण शकुनांचे दिवे लावतो आहे. प्राजक्त देह झाला ही निव्वळ प्रेमकविता आहे. सख्याला पाहून देह प्राजक्त झाला आहे. माझा रंध्र रंध्र अलवार पाकळ्यांच्या गंधात धुंद झाला आहे. हल्लीचा पाऊस बेभान झाला आहे. तो कुठेही आणि कसाही अंदाधुद बरसतो आहे. कुठे दुष्काळ तर कुठे ढगफुटी होते. तुझ्यावाचून गावाला शोष पडतो तर तुझ्यामुळेच गाव बुडतो आहे. कधी कधी त्याच्या कोसळण्याने झाड भीतीने गारठले आहे. तुझ्या येण्याने पूर्वी आनंद व्हायचा आता मात्र तो कधी बेछूट होऊन कोसळेल या भीतीने तसे सगळेच काळजीत पडले आहेत. झाडाच्या ‘’बुडाशी पडलेलं एक बीज आपल्याला भरवसा देतं की, पुन्हा सृष्टी बहरेल. अस्त म्हणजे अंतिम सत्य नव्हे तर अस्तानंतर उदय हा होणारच असतो, हा आशावाद त्या जागवतात. ‘ऋतुराज’ ही अशीच निसर्ग कविता आशादायी आहे. ‘गोंदून घेतले मी’ ही लयबध्द कविता गझलसदृश आहे. ती आसक्ती आणि विरक्तीची कविता आहे. ‘नभ शामल, मन, आयुष्य, गांधारी’ या कविता वाचनीय आहेत. आजकाल तिला गांधारी बनणं चालणार नाही. उलट तिनं डोळस बनून आपल्या अपत्यांची व नवऱ्याची काठी बनणं भाग आहे. ते व्यवहार्य नाही. कन्हैया ही कविता कृष्ण प्रेमाची आहे. तू आश्वासन दिल्याप्रमाणं आता अवतार घे व दुष्टांचे निर्दालन कर अशी प्रार्थना ती करते. माझ्या परमभक्ता या कवितेत ती भक्ताला मार्गदर्शन करते. काय देऊ तुला गड्या ही भावकविता आहे. गोंधळी ही कविता गोंधळ म्हणजे काय ते स्पष्ट करते. आभाळ आणि माती ही कविता जिवा शिवाचं ऐक्य सांगते. आई हा कवींचा आवडता विषय त्यावरची कविता आईचे महत्त्व सांगते. माऊलीच्या गर्भी मला ही कविता मुलीचा गर्भ खुडून टाकणाऱ्यांना चपराक आहे. या संग्रहात अनेक वाचनीय कविता आहेत. खूप कविता या समाजाला मार्गदर्शक आहेत. मुखपृष्ठ वेधक आहे. स्त्रीसुलभ भावनेच्या कविता या संग्रहात उल्लेखनीय आहेत. मृगधार होऊनि ही कविता भा. रा. तांबे यांच्या येई रुद्रा ये या कवितेशी नाते सांगते. चिंतामणी ही गणपतीचे गुणवर्णन आणि रूपवर्णन करणारी आहे. कवयित्रीने आकाशवाणी व दूरदर्शनवरून कविता सादरीकरण केले आहे. डॉ. विजया वाड लिखित सावित्रीच्या लेकी या पुस्तकात त्यांचा समावेश कर्तबगार महिला म्हणून आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या माजी अध्यक्ष आहेत. स्त्री सुलभ भावनेचा उद्गार अशी त्यांची कविता आहे. काजळखूण गौरी कुलकर्णी प्रकाशक – भरारी प्रकाशन मुंबई पृष्ठे १०४ मूल्य २०० रुपये
