
नाशिक:-(प्रतिनिधी ) प्रत्येक व्यक्ती डोळसपणे समाजाकडे बघत असतो. दैनंदिन जीवन व्यवहारात वावरत असताना जी विसंगती दिसते. तिला विनोदाची झालर दिली तर त्यातून वात्रटिकेचा जन्म होतो, असे प्रतिपादन मनमाड येथील कवी हेमंत वाले यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात हेमंत वाले ‘मनातले काही’ या पुस्तकावर बोलत होते. अध्यक्षस्थानी सुहास टिपरे होते. हेमंत वाले पुढे म्हणाले की, वात्रटिका लिहिताना राजकीय चर्चेतून अनेक मुद्दे सापडतात आणि तेच खाद्य वात्रटिकेसाठी महत्त्वाचे असते. कोणावरही टिका करता येत नाही पण वात्रटिकेच्या माध्यमातून प्रहार करण्याची संधी कवी शक्यतो सोडत नसतो. मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याची ताकद कवी आपल्या साहित्यात निर्माण करतो. त्यासाठी प्रसंगसावधानता बाळगली तर ते साहित्य समाजसुधारणेला प्रेरणा देते, असे सांगून त्यांनी काही वात्रटिका सादर केल्या. पोपट देवरे आणि राजेंद्र देसले यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर मधुकर गिरी यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (११) सदाशिव सुतार ‘निर्भर’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
