
नाशिक (प्रतिनिधी) सुपर ५० निवड चाचणी परीक्षा ६ जुलै रोजी न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे होणार मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून घेतली जाणारी सुपर ५० निवड चाचणी परीक्षा नांदगाव तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे ६ जुलै रोजी होणार आहे .परीक्षेची वेळ १०.३० ते १.३० अशी असणार आहे .याबाबतची बैठक व्यवस्था जाहीर झालेली आहे .नांदगाव तालुक्यातून ३३८ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत .या निवड चाचणी परीक्षेतून JEE व NEET साठी जिल्हयातून पहिल्या टप्यात सुमारे ८०० ते १००० विद्यार्थी निवडले जातील . त्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर पुन्हा चाळणी परीक्षा घेऊन अंतिम १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल . अंतिमतःनिवड झालेल्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयाची, निवासाची, शिकवणी वर्गाची मोफत सोय जिल्हा परिषद नाशिक तर्फे करण्यात येणार आहे .सदर निवड चाचणी परीक्षेसाठी A,B,C,D संच असणार आहेत .JEE,NEET अथवा दोन्ही असे पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे व त्यात सर्व विषय समाविष्ट राहतील . बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न त्यात असणार असून त्यातील एक योग्य पर्याय निवडायचा आहे .OMR sheet उत्तर पत्रिका असल्याने विद्यार्थ्यांनी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने गोल गडद करायचा आहे . पेन्सिलचा वापर करु नये . विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी आधारकार्ड किंवा फोटो असलेले ओळखपत्र सोबत ठेवायचे आहे . ऐनवेळी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत आधारकार्ड/ ओळखपत्र व दहावीचे गुणपत्रक आणणे आवश्यक आहे .या परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून गट शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले हे काम पाहणार आहेत . तर त्यांना सहाय्यक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी योगेश थोरात हे असणार आहेत .परीक्षा केद्रांची बैठक व्यवस्था, पर्यवेक्षक नेमणूका, भौतिक सुविधांची व्यवस्था इत्यादी बाबींचे व्यवस्थापन न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे ह्या करत आहेत .परीक्षेचे नियंत्रण अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी श्री किसन खातळे यांची नेमणूक करण्यात आली आहे . त्यांनी देखील या परीक्षा कामकाजाचा आढावा घेतला आहे .ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरलेले आहे ते सर्व विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहतील याची दक्षता सबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी घ्यावी व हा संदेश त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावा असे आवाहन गट शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी केले आहे .जिल्हा स्तरावर या परीक्षेच्या यशस्वितेसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे, शिक्षण विस्तार अधिकारी मनिषा पिंगळकर आदी नियोजन करत आहेत .

नाशिक जिल्हा परिषदेचा नावीन्यपूर्ण उपक्रम असलेल्या सुपर ५० परीक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवुन यात यश मिळवावे .सदर परीक्षेचे हे चौथे वर्ष असून यापूर्वीच्या परीक्षेतून निवड झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत JE/JEE/NEET परीक्षेत यश मिळवले आहे . हेच या उपक्रमाचे यश आहे .
आशिमा मित्तल
मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद नाशिक
