
डावीकडून किरण मेतकर, वैजयंती सिन्नरकर, सुभाष उमरकर, संजय आहेर, वैद्य भूपाल देशमुख, सुहास टिपरे व योगेश जाधव!!
नाशिक :(प्रतिनिधी )”चांगल्या पुस्तकाची निर्मिती हा सरस्वतीच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुहास टिपरे यांनी केले. ते युवा कवी योगेश जाधव यांच्या ‘पिंपळ’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.कवी वैद्यराज भूपाल देशमुख ह्यांचे हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन डॉ. श्रीकृष्ण सिन्नरकर महाराज यांच्या पवित्र वास्तूत, हिंद भूमी, म्हसरूळ, नाशिक येथे दिनांक २१ जून रोजी करण्यात आले. या वेळी कीर्तनचंद्रिका वैजयंती सिन्नरकर, कवी सुभाष उमरकर, विडंबनकार संजय आहेर, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सुहास टिपरे म्हणाले,”स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानच्या कारागृहात ‘काळे पाणी’ ही साहित्यनिर्मिती केली, तर लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात ‘गीता रहस्य’ लिहिले. जेव्हा अशा प्रतिकूल आणि नकारात्मक वातावरणातही उच्च दर्जाचं साहित्य निर्माण होऊ शकतं, तेव्हा आपण सकारात्मक वातावरणात, प्रगत तांत्रिक सुविधा, वाचनालये आणि पुस्तके सहज उपलब्ध असताना उत्तम साहित्य निर्माण करू शकत नाही का? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लाभलेला असताना, आपण अशी संस्कार घडवणारी आणि वाचनीय पुस्तके लिहून मराठी वाङ्मय समृद्ध करायला हवं.” तसेच ते पुढे म्हणाले,”पुस्तके ही नाराज व व्यथित मनाला आधार देतात. विनोदी पुस्तके दुःखी मनाला आनंदित करतात. साने गुरुजींचं ‘शामची आई’ हे पुस्तक लहान वयात संस्कार घडवण्यासाठी प्रभावी ठरतं. त्यामुळे चांगल्या पुस्तकांची निर्मिती होण्यासाठी सर्व साहित्यिकांनी प्रयत्न करायला हवेत.” कार्यक्रमात डॉ. भूपाल देशमुख, कीर्तनचंद्रिका वैजयंती सिन्नरकर, विडंबनकार संजय आहेर, कवी योगेश जाधव, यांनी आपली मनोगते व्यक्त केले. अलककार सुभाष उमरकर यांनी योगेश जाधव यांच्या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या साहित्यिक किरण मेतकर यांनी दिमाखदार सूत्रसंचालन केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कवी योगेश जाधव यांनी वैजयंती सिन्नरकर यांचा साडी पेन गुलाब पुष्प देऊन सन्मान केला, तसेच अध्यक्ष सुहास टिपरे, ज्यांच्या शुभ हस्ते प्रकाशन झाले डॉ. भूपाल देशमुख, प्रमुख पाहुणे विडंबंकार संजय आहेर, अलककार सुभाष उमरकर यांना शाल, गुलाब पुष्प, पेन देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे आलेल्या सर्व कवी /कवयित्री यांना योगेश जाधव यांनी पेन व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे कीर्तनकार वैजयंती सिन्नरकर यांच्या घराच्या ओट्यावर होणारा ‘वाढदिवसाचा ओटा’ हा कार्यक्रम.येथे अनेक वाढदिवस साजरे होतात, तसेच काव्य संमेलनही पार पडतात. याच ओट्यावर पहिल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दरम्यान ज्या ज्या व्यक्तींचा वाढदिवस होता, त्यांना औक्षण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी कवी संमेलन पार पडले. अनेक कवींनी आपल्या सुंदर रचना सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. या प्रकाशन सोहळ्या साठी कवियत्री अलका दराडे, गझल कार अजय बिरारी, कवी निशांत गुरु, कवी विलास पंचभाई, कवी सोमनाथ पगार कवियत्री कविता कासार, श्री निजामपूरकर, कवी अरुण घोडेराव, कवी गोरख पालवे,जादूगार अभिजित कन्नडकर, सौं आहेर, ( संजय आहेर यांच्या पत्नी ) ,भाऊराव साळवे,कवी रतन हिरे,क्षितिजा खटावकर, सोनाली भट,उपस्थित होते. कवी / कवयित्रींनी उत्तम कविता सादर करत संमेलन रंगतदार बनवले. वैजयंती सिन्नरकर यांनी आभार प्रदर्शन केले. नाष्टा चहापानी नंतर कार्यक्रमाची सांगता केली.
