
लासलगाव : दि. २१ जून लासलगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक योग दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या एन सी सी विभाग व योग ध्यान केंद्र यांच्या वतीने पाच दिवसीय योग कार्यशाळेचे आयोजन दि १६ जून ते २० जून २०२५ दरम्यान करण्यात आले. या कार्यशाळेची सांगता आंतरराष्ट्रीय योग दिनी झाली.

या कार्यशाळेत एन सी सी चे ४० छात्र व शिक्षक-शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या पाच दिवसात साधकांनी योग साधनेतील सूर्य नमस्कार, शवासन, द्विपाद उत्तानपादासन, पवन मुक्तासन, अर्ध चक्रासन, पश्चीमोत्तानासण, तितली आसन, भुजंगासन, शलभासन, शशांकासन, भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम आदी आसनाचा दररोज एक तास अभ्यास केला. योग प्रशिक्षक मोनिका जोशी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. योग ही एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्रिया आहे जी भारतात खूप वर्षांपासून केली जाते. शरीर आणि मन निरोगी बनवण्यासाठी योग साधना अत्यंत आवश्यक आहे. आज जगभरात योग साधनेला विशेष महत्व प्राप्त झाले असून संपूर्ण जगात अतिशय उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. या वर्षीच्या योग दिनाचे थीम ‘एक पृथ्वी एक स्वाथ्य’ ही आहे. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांनी कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी व योग दिनी केले.

कार्यशाळेचे संयोजन एन सी सी अधिकारी लेफ्टनंट बापू शेळके यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नू.वि.प्र. संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, ७ – महाराष्ट्र एन सी सी बटालियन नाशिक चे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल एम एस किरौला व प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल कनिष्क गौर यांचे मार्गदर्शन व शुभेच्या लाभल्या.
