
जळगाव निंबायती (वार्ताहर) नियमित योगाभ्यासाने मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले जाऊन जीवनाचा प्रवास शांत, संयमी, आनंदी, सुखकारक आणि सर्वार्थाने सफल होतो. योगसाधनेशी जोडलेली व्यक्ती आपल्या सोबतच इतरांचेही कल्याण व्हावे यासाठी सदैव कटिबद्ध असते. योगसाधना ही केवळ एका दिवसापुरता किंवा तासाभरासाठी करावयाची क्रिया नसून, ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

योग ही एक परिपूर्ण जीवनपद्धती असून दुःखनाशनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणून नियमित योगाभ्यास करावा, असे आवाहन विवेकानंद केंद्राचे मा. नगरप्रमुख तथा उपक्रमशील प्रा. अमोल अहिरे यांनी केले, ते जळगाव निंबायती येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील विद्यालयात आयोजित सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमात बोलत होते. प्रसंगी संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रा. अहिरे यांनी शिथिलीकरण, योगासने, प्राणायाम यांची शास्त्रोक्त माहिती देऊन, त्यापासून होणारे फायदे व महत्त्व अधोरेखित केले. शिवाय त्यांचे प्रात्यक्षिक करून घेतले.

तसेच बीजमंत्रासह सामूहिक सूर्यनमस्कार व योगनिद्रा, शवासन आदींचा योगाभ्यास करून घेतला. प्रसंगी जेष्ठ शिक्षक डी. के. जगताप, प्रा. सी. डी. राजपूत यांनी शास्त्रोक्तपणे प्रात्यक्षिके करुन दाखवले.
