
नाशिक:-(प्रतिनिधी )वारकरी संप्रदायाने संत ज्ञानेश्वरांसह ज्ञान आणि चिंतन मुक्तहस्ते समाजाला वाटले. जीव आणि शिव हे एकच असल्याचे मांडणारा वारकरी संप्रदाय म्हणजे संस्कृती आणि संस्कारांचे अनोखे तत्त्वज्ञान आहे, असे प्रतिपादन डॉ. सुरेखा जाधव यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात डॉ.सुरेखा जाधव ह्या ‘निस्पृह साधक’ या पुस्तकावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक वाळू आहेर होते.
डॉ.जाधव पुढे
म्हणाल्या की, पंढरपूरच्या विठोबाचे परमभक्त असणारे वारकरी त्याच्या भेटीसाठी लाखो मैल दिंडी घेऊन जातात. ‘राम कृष्ण हरी’ हा मंत्र आणि वारकरी संप्रदायातील विविध संतांचा विचार घेऊन पोपट महाराज यांनी आपले कार्य उभे केले. त्यांचे जीवनचरित्र जवळून अनुभवता आले. या साधकाच्या निस्पृहपणाचे अनेक दाखले या पुस्तकात मांडलेले आहेत. त्यांचे जीवन चरित्र म्हणजे भक्ती आणि जिव्हाळा यांचा अनोखा संगम असल्याचे सांगून त्यांनी पोपट महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
माजी आ.नानासाहेब बोरस्ते आणि अजित कुलकर्णी यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर सुहास टिपरे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (२०) पिंपळगाव बसवंत येथील सरला मोते ‘कृष्णमंजिरी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
