
सटाणा:( प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय मुळाणे येथे नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ नवागतांच्या स्वागताने उत्साहात साजरे करण्यात आले .” *ही आवडते मज मनापासून शाळा ,लाविते लळा जसा माऊली बाळा **” या उक्ती प्रमाणे नवीन शालेय जीवनात पदार्पण करणारे अर्थात इयत्ता ५वी त व इयत्ता ८ वीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शालेय परिपाठाने व महाराष्ट्र राज्यगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी मा.बधान सर तसेच शालेय समिती अध्यक्ष मा.दिलीप नाना रौंदळ आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.डी.पगारे व पालक उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले.प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.डी.पगारे यांनी शाळेचा पहिला दिवस ,शालेय जीवन त्यातील अनुभव व संस्कारांची शिदोरी ही सर्वात मोठी असते असे सांगितले.त्यानंतर नव्याने दाखल विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्या पाऊलखुणा उमटवून स्वागत करण्यात आले. तसेच माध्यमिक शिक्षणाची सुरुवात स्मरणात राहावी यासाठी विद्यार्थ्यांचे सेल्फी काढण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी फुले ,रांगोळी ,पताका लावून शालेय परिसराची सजावट करण्यात आली .सदर कार्यक्रमाचे नियोजन शालेय सांस्कृतिक समिती ने केले .कार्यक्रमासाठी विद्यालयाचे कलाशिक्षिका श्रीम.एल.एस.बच्छाव यांनी उत्कृष्ट फलकलेखन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक आबा अहिरे यांनी व आभार विद्यालयाचे शिक्षक श्रीम.दिपाली सावकार यांनी मानले.कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
